
वेंगुर्ला:
विविध ग्रामपंचायतवर काम करत असताना ग्राम स्थरावर स्वछता अभियान, स्मार्ट ग्राम अभियान राबवत यश प्राप्त केल्याबद्दल तसेच गावात विविध उपक्रम हाती घेऊन ते यशस्वी केल्याबद्दल परुळेबाजार ग्रामसेवक शरद शिंदे यांना मनोरमा महादेव चौधरी चॅरिटेबल ट्रस्ट व प्रगत सिंधुदुर्ग मुंबई यांच्या वतीने २०२२- २३ चा विशेष सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते शरद शिंदे यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी जि. प. माजी उपाध्यक्ष रणजित देसाई, पंचायत समिती सदस्य वालावलकर, मनोरमा महादेव चौधरी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष दयानंद चौधरी आदी उपस्थित होते. ग्रामसेवक शरद शिंदे यांनी वेंगुर्ला तालुक्यातील सागरतीर्थ, भोगवे, चिपी, कुशेवाडा येथे काम केले असून सध्या ते परुळेबाजार ग्रामपंचायत येथे कार्यरत आहेत. शिंदे यांनी भोगवे ग्रामपंचायत येथे असताना भोगवे ग्रामपंचायतला स्मार्ट ग्राम योजना, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात तालुका, जिल्हा व विभाग स्तरावर पुरस्कार मिळाले होते. उत्कृष्ट बिचसाठी देण्यात येणार समुद्रमंथन हा सुद्धा त्यांच्याच कालावधीत भोगवे ग्रा.प. ला मिळाला होता. तसेच आंतरराष्ट्रीय दर्जाचा ब्लू फ्लॅग नामांकन भोगवे ग्रामपंचायतला मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. या कारणामुळेच भोगवे गाव जगाच्या नकाशात पर्यटनात पुढे आले. यानंतर कुशेवाडा ग्रामपंचायत येथे शिंदे यांच्याकडे अतिरिक्त भार असताना ग्रामपंचायतला संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानात राज्यात तृतीय क्रमांक प्राप्त झाला होता.
दरम्यान ते सध्या परुळेबाजार येथे कार्यरत आहेत. या ग्रामपंचायतला सुद्धा विविध पुरस्कार त्यांच्याच कार्यकाळात मिळाले आहेत. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान परुळेबाजार ग्रामपंचायत तालुकास्तर प्रथम, जिल्हास्तर प्रथम क्रमांक मिळवला असून आता विभाग स्तरावर नुकतीच पाहणी करण्यात आली. तसेच साध्य या ग्रामपंचायतमध्ये ते विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहेत. यात सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प, अस्मिता कक्ष, प्लास्टिक मुक्त गाव, सार्वजनिक विहिरीवर टीसीएल डोजर मशीन, सार्वजनिक गांडूळ खत युनिट, डिजिटल शाळा अंगणवाडी, वाय-फाय सुविधा, महिलांना रोजगार निर्मितीसाठी काथ्यापासून विविध वस्तू बनवणे प्रकल्प याचा समावेश आहे. याचीच दखल घेऊन सन २०२०-२१ मधील आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने शरद शिंदे यांचा जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांनी सन्मान केला होता. आणि या सर्वांची दखल घेत शरद शिंदे यांना हा विशेष सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.