
कुडाळ : केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा लाभ जास्तीत जास्त पात्र आणि गरजू कुटुंबांपर्यंत पोहोचवण्यासाठी कुडाळ तालुक्यात विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. आगामी 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर' अभियानांतर्गत या योजनेची प्रभावी अंमलबजावणी केली जाणार असल्याचे आवाहन तहसीलदार सचिन पाटील यांनी केले आहे.
या योजनेअंतर्गत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील मुख्य कमावती व्यक्ती (पुरुष किंवा स्त्री) मरण पावल्यास, त्या कुटुंबाला शासनाकडून २०,००० रुपये एकरकमी अर्थसाहाय्य दिले जाते. या योजनेसाठी पात्रतेचे निकष खालीलप्रमाणे आहेत:
वयोगट: मयत व्यक्तीचे वय १८ ते ५९ वर्षांच्या दरम्यान असावे.
क्षेत्र: ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांतील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे यासाठी पात्र आहेत.
कालावधी: मयत व्यक्तीच्या मृत्यूच्या दिनांकापासून ३ वर्षांच्या आत अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
महसूल व वन विभागाच्या शासन निर्णयानुसार, ०७ मार्च २०२६ ते १५ मे २०२६ या कालावधीत मंडल स्तरावर 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर' अभियान (टप्पा - १) राबवले जाणार आहे. या अभियानात राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेचा समावेश करण्यात आला असून, नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
अर्ज कोठे आणि कसा करावा?
इच्छुक अर्जदारांनी संबंधित गावचे ग्राम महसूल अधिकारी / ग्रामपंचायत अधिकारी यांच्यामार्फत किंवा थेट तहसीलदार कार्यालयातील संजय गांधी शाखेकडे परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा.
आवश्यक कागदपत्रे:
योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील कागदपत्रे प्रस्तावासोबत जोडणे अनिवार्य आहे:
१. विहित नमुन्यातील अर्ज.
२. मयत व्यक्तीचा मृत्यू दाखला.
३. वयाचा पुरावा (आधारकार्ड किंवा शाळा सोडल्याचा दाखला).
४. कुटुंब दारिद्र्यरेषेखाली असल्याबाबतचा ग्रामपंचायतीचा दाखला.
५. अर्जदारास कुटुंबप्रमुख ठरवल्याबाबतचा ग्रामपंचायत अधिकाऱ्याचा दाखला.
६. अर्जदाराच्या बँक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत.
७. अर्जदाराचे आधारकार्ड छायांकित प्रत.
"तालुक्यातील पात्र कुटुंबांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, जेणेकरून संकटाच्या काळात कुटुंबाला आर्थिक आधार मिळेल."
— सचिन पाटील, तहसीलदार कुडाळ











