
कुडाळ : कुडाळ शहरातील पडतेवाडी, एक्सीस बँकेच्या मागील बाजुस असलेल्या अनंत वैद्य यांच्या बंद बंगल्यातील कपाटात ठेवलेले रोख 90 हजार रूपयासह सुमारे 12 लाख 4 हजार 500 रूपये किमंतीच्या सोन्याच्या दागिने मिळुन सुमारे 12 लाख 94 हजार 500 रूपये मुद्देमालाची चोरी प्रकरणातील संशयित आरोपी अक्षय म्हाडेश्वर (रा. कुडाळ क्षितिज अपार्टमेंट ) याला चोरीस गेलेल्या मुद्देमालासह 24 तासाच्या आत ताब्यात घेत अटक केली असुन या प्रकरणी न्यायालयाने त्याला दोन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
या चोरी प्रकरणी कुडाळ पोलिस ठाण्यात अनंत वैद्य यांनी तक्रार दिली की, ते त्यांची पत्नी व विवाहीत मुलगी व तिची मुले यांच्यासह पडतेवाडी एक्सीस बँकेच्या मागील बाजुस असलेल्या स्वताच्या बंगल्यात राहतात. दि. 03 डिसेंबर रोजी हे सर्वजण सांयकांळी 9 वाजण्याच्या सुमारास बाबा वर्दम थिएटर्स येथे नाटक पहायला गेले होते. त्यानंतर रात्री 12.30 वा. सर्वजण घरी आले व झोपले. य दुसर्या दिवशी दि. 04 रोजी सायंकाळी सर्वांना गोवा येथे लग्नाला जायचे असल्याने 4.30 वा. च्या सुमारास वैद्य त्यांच्या घराच्या वरील मजल्यावरील रूममधील लाकडी कपाटात ड्रॉवरमध्ये ठेवलेली रोख घेण्याकरीता गेले व कपाट उघडले असता त्यांना त्यामधील 40 हजार रुपये रक्कम दिसून आली नाही. याबाबत त्यांनी पत्नीला माहिती दिली असता त्यांनी त्यांच्या खोलीतील लाकडी कपाटाचा ड्रॉवर उघडून पाहीला असता त्यामधील ही रोख रक्कम 50 हजार व सुमारे 12 लाख 4 हजार रूपये किमंतीचे सोन्याचे दागिने दिसून आले नाहीत. तसेच कपाटाचे ड्रॉवर हे कोणत्यातरी साधनाने उचकटलेले दिसुन आले. या नंतर त्यांनी संपूर्ण घरात पहाणी केली असता देवाच्यातील दोन हजार रुपये तसेच बेहरुमध्ये कपात ठेवलेले पाचशे रुपये गायब होते अशी तक्रार दिली होती.
या प्रकरणी कुडाळ पोलिस निरीक्षक रूणाल मुल्ला यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक ब्रह्मानंद सुर्यवंशी हे तपास करीत होते. सदरची ही चोरी दि. 03 रोजी रात्री 9.00 ते आज दि. 04 डिसेंबर 12:30 वा. च्या मुदतीत घरातील सर्वजण घराबाहेर गेलेले असतानाचा केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला. व अधिक तपासासाठी श्वान पथक, ठसे तज्ञ यांना ही आणण्यात आले होते.
घटनास्थळी मिळालेले ठसे, आजुबाजुचे सीसीटिव्ही फुटेज तसेच इतर यंत्रणाच्या आधारे कुडाळ पोलिसांनी तपास करताना मंगळवारी सांयकांळी क्षितिज अपार्टमेंट येथे राहणार्या अक्षय म्हाडेश्वर याला संशयित म्हणून ताब्यात घेतले. व अधिक तपास करताना त्याच्या कडे असलेल्या मोटारसायकल च्या डिक्कीत त्याने सर्व चोरलेले दागिने ठेवले होते. ते ही पोलिसांनी ताब्यात घेतले. यात दोन सोन्याच्या चैनी व रोख रक्कम मात्र अजुनही मिळाली नाही.
चोरट्याने किचन मधुन घरात केला प्रवेश
बंद असलेल्या बंगल्याचा एकही दरवाजा, कुलुप किंवा खिडक्या तोडलेल्या नव्हत्या, त्यामुळे चोरटा आत गेला कसा हा प्रश्न निर्माण झाला होता. अखेर संशयित अक्षयने सदरील बंगल्यात पाठीमागे असलेल्या किचनच्या दरवाजा तुन प्रवेश केल्याचे सांगितले.
अजुन किती चोरी प्रकरणात आहे का?
या अगोदर घडलेल्या काही चोर्या मध्ये संशयित अक्षय याचा सहभाग आहे का? याचाही तपास कुडाळ पोलिस करीत आहेत.
24 तासात संशयिताला अटक
चोरीचा गुन्हा दाखल केल्या पासुन अवघ्या 24 तासाच्या आत या चोरी प्रकरणी संशयित अक्षय याला पोलिसांनी ताब्यात घेतले, तसेच मुद्देमालही हस्तगत केला आहे.
अक्षय याने चोरी करताना वापरलेली मोटारसायकल ही एका मित्राची होती. त्यातच त्याने चोरी केलेले दागिने ठेवले होते. या चोरी प्रकरणात अक्षय बरोबर अजुन कोणी साथीदार आहे का, याचा तपास कुडाळ पोलिस करीत आहेत अशी माहिती पोलिस निरीक्षक रूणाल मुल्ला यांनी दिली.