गणेशोत्सवापुर्वी वैभववाडी रेल्वेस्थानकातील समस्या मार्गी लावा

आमदार नितेश राणे यांच्या रेल्वे अधिकाऱ्यांना सुचना
Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: July 27, 2024 14:59 PM
views 237  views

वैभववाडी : वैभववाडी रेल्वे स्थानकातील स्थानिक पातळीवर सुटणाणा-या समस्या गणेश चतुर्थीपुर्वी सोडवाव्यात.तसेच  आरक्षणासहीत इतर विषय खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन सोडविल्या जातील.जी कामे स्थानिक पातळीवर होणे शक्य आहेत ती तात्काळ सुरू करा अशा सुचना आमदार नितेश राणे यांनी येथे रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिल्या.तसेच काही विषयांवरून त्यांची कानउघडणी केली.

आमदार श्री.राणे यांनी आज (ता.२७)वैभववाडी रेल्वे स्थानक आणि वैभववाडी बस स्थानकांची पाहणी करीत स्थानिक पदाधिकारी आणि प्रवाशांकडुन समस्या जाणून घेतल्या.यावेळी त्यांच्यासोबत रेल्वेचे विभागीय उपव्यवस्थापक राजु पडगर,विवेक अंबाडेकर,जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे,नासीर काझी,भालचंद्र साठे,दिलीप रावराणे,सुधीर नकाशे,बंडु मांजरेकर,अरविंद रावराणे,प्राची तावडे,नेहा माईणकर,शारदा कांबळे,संजय सावंत आदी उपस्थित होते.

आमदार श्री.राणे हे वैभववाडी रेल्वेस्थानकात गेल्यानतंर स्थानिक पदाधिकारी आणि प्रवाशांनी रेल्वेस्थानकातील समस्या मांडल्या.वैभववाडी रेल्वे स्थानकात आरक्षण होत नसल्यामुळे मोठी गैरसोय होते. रेल्वेच्या अखत्यारीत असलेला रस्ता आणि रेल्वेस्थानकासमोरील परिसरात मोठे खड्डे पडलेले आहेत. प्लॅटफॉर्मला शेड नाही,प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवर जाण्यासाठी उड्डाण पुल नाही,प्लॅटफॉर्मवर शौचालय,पिण्याचे पाणी नाही,अनेकदा वेटिंग रूम बंद असते तर कधी स्वच्छता गृह बंद असते त्यामुळे प्रवाशांची कुचंबणा होते.रिक्षा चालकांनी रिक्षा स्टॅन्ड मंजुर करण्याची मागणी केली.यासंदर्भात आमदार श्री.राणे यांनी अधिकाऱ्यांना विचारले असता

काही कामांची निवीदा प्रकिया व्हायची असल्याचे सांगीतले.यावेळी श्री.राणे यांनी गणपतीला मोठ्या प्रमाणात चाकरमानी गावी येतात.त्यामुळे स्थानिक पातळीवर होणारी जी कामे आहेत.ती येत्या आठ ते दहा दिवसांत पुर्ण करा. उड्डाण पुलाचे भुमिपुजन ३१ जुलैला व्हायला पाहीजे.गणेशोत्सवापुर्वी अधिकत्तर कामे पुर्ण करा.रेल्वेबोर्डाकडुन जी कामे करायची आहेत.त्याची यादी द्या त्याचा पाठपुरावा खासदार नारायण राणेंच्या माध्यमातुन करून ती मार्गी लावण्यात येतील.क्षुल्लक कारणासाठी प्रवाशांना त्रास देवु नका.प्रत्येक वेळी समस्या ऐकुन घेणार नाही असा इशारा देखील त्यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिला.यावेळी प्रमोद रावराणे यांनी कणकवली आणि सांवतवाडीप्रमाणे वैभववाडी रेल्वेस्थानकाचे सुशोभिकरण करावे अशी मागणी केली.

त्यानंतर आमदार श्री.राणे यांनी वैभववाडी बसस्थानकातील समस्यांचा आढावा घेतला.यावेळी वैभववाडी बसस्थानक परिसर कॉक्रीटीकरणाच्या कामाला तातडीने सुरूवात करावी.निवारा शेडचे काम सुरू करावे,पिण्याची पाण्याची व्यवस्था करावी अशी सुचना त्यांनी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना केली.यावेळी त्यांनी कॉक्रीटीकरणाच्या कामाचा शुभारंभ केला.