राष्ट्रीय बालश्री प्रसाद घाडी स्मृती कला पुरस्काराने सोहम साळगांवकरचा होणार सन्मान

Edited by: विनायक गावस
Published on: November 07, 2023 16:45 PM
views 597  views

सावंतवाडी : दादा गावकर सामाजिक प्रतिष्ठानतर्फे राष्ट्रीय बालश्री प्रसाद नागेश घाडी स्मृती कला पुरस्कार देवून सोहम दिनेश साळगांवकर याला सन्मानित करण्यात येणार आहे. सोहम दिनेश साळगांवकर हा सावंतवाडी येथील असून तो सध्या राणी पार्वतीदेवी हायस्कूल व ज्यू. कॉलेज सावंतवाडी या प्रशालेत इयत्ता ६ वीत शिकत आहे. त्याला ओस्टिओजेनेसिस इम्परफेक्टा नावाचा हाडांचा आजार आहे. या आजारात हाडे ठिसूळ असतात. त्यामुळे वरचेवर त्याला फ्रॅक्चर झाले आहेत. तो केवळ १ वर्षाचा असताना या आजाराचे निदान झाले. गोवा - मुंबई - पुणे सगळीकडे उपचार करुन झाले. यातून एक कळलं की हा आजार बरा होणार नाही.

सोहमने आणि त्याच्या पालकांनी ही परिस्थिती स्वीकारली. त्याचे पालक त्याला फुलासारखे जपतात. घरातील माणसांशिवाय सोहमला कुणीच उचलून घेवू शकत नाही. परंतू ह्या परिस्थितीवर सुद्धा मात करुन अभ्यासासोबत संगीत आणि पेटीवादनाची साधना सुरु केली. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या गीतगायन व पेटीवादनाच्या प्रत्येकी ३ परीक्षा त्याने उत्तीर्ण केल्या आहेत. त्याला चित्रकलेची आवड आहे. तसेच तो उत्तम प्रकारे बुद्धिबळ व कॅरम खेळू शकतो. तालुका तसेच जिल्हास्तरावर विविध स्पर्धांमध्ये भाग घेवून तो बक्षिसं पटकावतो. 'दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती' ही उक्ती सोहमच्या बाबतीत म्हटल्यास वावगे ठरणार नाही. परिस्थितीवर मात करत सोहमने दाखविलेल्या लढवय्या वृत्तीसाठी त्याला यंदा दादा गावकर सामाजिक प्रतिष्ठानतर्फे राष्ट्रीय बालश्री प्रसाद नागेश घाडी स्मृती कला पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येणार आहे.

सोहमला मिळालेल्या या सन्मानाबद्दल सर्व शिक्षकवृंद व पालक या सर्वांचे शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी अध्यक्ष विकास सावंत, सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर व सर्व संस्था सदस्य तसेच मुख्याध्यापक जे. व्ही. धोंड उपमुख्याध्यापक पी.एम.सावंत व उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक यांनी अभिनंदन केले आहे‌.