
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गातील सर्व रेल्वे स्थानकांवर अनेक समस्या आहेत. कोकण रेल्वे प्रशासनाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुविधा देताना सापत्नभावाची वागणूक देऊ नये , गोवा, रत्नागिरी प्रमाणे येथेही सुविधा निर्माण करा. गणेशोत्सवा पूर्वी सर्व स्थानकांची स्वच्छता आणि पाणी सुविधा निर्माण करा.तसेच सिंधुदुर्ग स्थानकावर तिकीट आरक्षण सुविधा सुरु करा अशा सूचना जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांना आयोजित दिल्या .
कोकण रेल्वे संघर्ष व समन्वय समितीच्या आपल्या विविध मागण्यांसाठी 1 ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकावर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता या पार्श्वभूमीवर आज बुधवारी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी संघटनेचे पदाधिकारी व रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी यांची एकत्रित बैठक घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पावसकर तसेच नंदन वेंगुर्लेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेल्वे स्थानकावर असलेल्या समस्या तसेच अपुऱ्या सुविधांबाबत जिल्हाधिकारी यांचे लक्ष वेधले तसेच रेल्वे प्रशासनाकडे गेली दोन वर्ष पत्रव्यवहार तसेच प्रत्यक्ष भेटी देऊ नये त्यामध्ये कोणतीही सुधारणा झालेली नाही याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली
याबाबत गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना याचा जाब विचारत ज्या सुविधा आणि समस्या आपल्या अधिकारात सुटण्यासारख्या आहेत त्या अद्याप का सोडवल्या जात नाहीत लांब पल्ल्याच्या गाड्या सिंधुदुर्गातील प्रमुख स्थानकावर थांबविल्या जात नाहीत याबाबत प्रवाशांमध्ये संताप आहे म्हणूनच संघटनेच्या माध्यमातून आंदोलनाचा इशारा दिला आहे. रत्नागिरी व गोव्यामध्ये ज्या प्रमाणे सुविधा आहेत त्याच प्रमाणे येथेही आवश्यक सुविधा निर्माण करा .या जिल्ह्याला वेगळी वागणूक नको ,गणेशोत्सवापूर्वी सर्व स्थानकांतील समस्या दूर करा ,अश्या सूचना यावेळी उपस्थित रेल्वे अधिकाऱ्याना केल्या .
रेल्वे प्रवासी समन्वय समितिच्या पदधिकाऱ्यानी यावेळी विविध समस्याकडे लक्ष वेधताना जिल्हा मुख्यालयाचे प्रमुख रेल्वे स्थानक असलेल्या सिंधुदुर्ग स्थानकावर सर्व रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा. तसेच २० ऑगस्ट ते १० सप्टेंबर२०२५ या गणेशोत्सव कालावधीत मडूरे ते दादर व सावंतवाडी ते दादर अशा दोन नवीन गाड्या तात्काळ सुरू कराव्यात,सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकासह वैभववाड़ी नांदगांव येथे तिकीट आरक्षण सुविधा सुरु करा . सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण ,वैभववाडी,आचिर्ने ,नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ,झाराप, सावंतवाडी ,मडूरा या सर्व दहा रेल्वे स्थानका वरील प्रवाशांसाठी चांगल्या सोयी सुविधा निर्माण करा. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये न थांबणाऱ्या सर्व जलद गाड्यांना सिंधुदुर्ग स्थानका सह विविध रेल्वे स्थानकावर कायमस्वरूपी थांबा मिळावा.प्लॅटफॉर्म सुविधा नसलेल्या सर्व रेल्वे स्थानकावर प्लॅटफॉर्म सुविधा निर्माण करावी याकडे लक्ष वेधले तसेच कोकण रेल्वे मार्गावरुन धावणाऱ्या सर्व गाड्या , आणि त्यांना कुठे थांबा आहे याची माहिती द्यावी अशी मागणी केली .
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीस यावेळी निवासी उप जिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे ,रेल्वे प्रशासनाचे अधिकारी मधुकर मातोंडकर ,शैलेश बापट ,सचिन देसाई ,शैलेश आंबाडेकर ,रेल्वे प्रवासी समन्वय संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पावसकर, सचिव अजय मयेकर उपाध्यक्ष परशुराम परब, शुभम परब, स्वप्निल गावडे, ऍड नंदन वेंगुर्लेकर, आदीसह मोठया संखेने पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीनंतर रेल्वेचे अधिकारी, संघटनेचे पदाधिकारी , जिल्हा प्रशासनाचे अधिकारी यांनी सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकाची पाहणी करून तेथील समस्या जानून घेतल्या .यावेळी रेल्वे स्थानकाची स्वच्छता व पाण्याची सुविधा यासह आवश्यक सुविधा येत्या चार दिवसात न झाल्यास जिल्ह्यातील सर्व स्थानकावर भिक मागो आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पावसकर सह पदाधिकाऱ्यानी दिला .