
सावंतवाडी : "दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना कम है !" या हिंदी चित्रपटातल्या ओळी जेव्हा आपण समाजातील आपल्यापेक्षा अनेक दुःख व यातनामय जीवन जगणाऱ्या व्यक्तींना पाहतो, तेव्हा नकळत आपल्या ओठांवर फुलते. मात्र हे गाणे केवळ ओठांवर फुलण्यापुरते मर्यादित न राहता, त्यापलीकडे जाऊन समाजासाठी झटण्याची प्रवृत्ती आणि गरजवंतांना ज्या गोष्टीची आवश्यकता आहे ती पुरवण्याचे धाडस फार क्वचित लोकांमध्ये असते. आता सावंतवाडी शहरामध्ये निरंतरपणे हेच महान कार्य हाती घेतले आहे ते रवी जाधव आणि सामाजिक बांधिलकी या त्यांच्या टीमने.
हरिश्चंद्र शेटकर (वय ८१) व तारामती शेटकर (वय ७१) या निराधार वृद्ध दांपत्याला आपल्या वृद्ध अवस्थेमध्ये अत्यंत हलाखीचे जीवन जगावे लागत आहे. वृद्ध तारामती चक्कर येऊन पडल्यामुळे तिचा हात फ्रॅक्चर झाला. त्यावेळी एका सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्याने तिला सावंतवाडी सरकारी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले. त्या वृद्ध महिलेच्या हाताला फ्रॅक्चर असून हॉस्पिटलमध्ये गेले चार दिवस उपचार घेत होत्या.
वृद्धपकाळात उपासमारीमुळे हे वृद्ध दांपत्य हलाखीचे जीवन जगत असल्याची माहिती हॉस्पिटलमधील सिक्युरीटी गार्ड अडाळकर यांनी सामाजिक बांधिलकीच्या रवी जाधव यांना दिली असता सामाजिक बांधिलकीची टीम तात्काळ हॉस्पिटलमध्ये पोहोचली. त्यावेळी त्या निराधार वृद्ध दांपत्याने सामाजिक बांधिलकीसमोर आपली व्यथा मांडली. आम्हाला मूल-बाळ नसल्यामुळे या वयामध्ये कष्ट करून जीवन जगणं कठीण झालेले आहे. काही खायला न मिळाल्यास उपाशी झोपावं लागतं, तर आजारी पडतो तेव्हा पैसे नसल्यास डॉक्टरकडेपण जाणे कठीण होऊन जाते. घरामध्ये अन्नाचा एक कणही नाही, तर पदरी एकही पैसा नाही, अशी करुणामय कहाणी त्यांनी सामाजिक बांधिलकीसमोर व्यक्त केली.
दरम्यान, त्यांना डिस्चार्ज होऊन एक दिवस झाला होता, परंतु घरी परतण्यासाठी पैसे नसल्यामुळे त्यांना घरी पोहोचणे कठीण झाले होते. अशावेळी सदर पेशंटचा डिस्चार्ज घेऊन सामाजिक बांधिलकीचे कार्यकर्ते प्रा. सतीश बागवे, हेलन निब्रे, रवी जाधव, संजय पेडणेकर यांनी औषध पाण्यासाठी आर्थिक मदत केली तसेच त्यांना राशन घेऊन दिले. तर ॲम्बुलन्सचे मालक हेमंत वाळके (इन्सुली) व चालक लक्ष्मण शिरोडकर यांनी विनामूल्य त्या दांपत्यास त्यांच्या राहत्या घरी कारिवडे येथे सुखरूप सोडले .
'सामाजिक बांधिलकी'च्या अशा निरंतर आणि अत्यंत विधायक कार्याचे शब्दात कौतुक करणे कदापि शक्य नाही. मात्र तरी देखील अनेक सामाजिक कार्यकर्ते, हितचिंतक व समाजाभिमुख कार्य करणाऱ्या समाजसेवकांनी सामाजिक बांधिलकीच्या या हाती घेतलेल्या कार्याचे तोंड भरून कौतुक केले आहे