
वैभववाडी : मांगवली गावातील बहुआयामी व्यक्तिमत्त्व भास्कर भिकू संसारे ऊर्फ बंधू संसारे (वय ८६) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. गावच्या सामाजिक, शैक्षणिक जडणघडणीत त्यांचे खूप मोठे योगदान आहे.
'बंधू संसारे' या टोपणनावाने ते सर्वत्र परिचित होते. त्यांचा स्वभाव समंजस आणि तितकाच करारी होता. कोकण विद्या प्रसारक मंडळाच्या माध्यमातून मांगवली गावात माध्यमिक विद्यालयाच्या उभारणीत त्यांचे खूप मोठे योगदान आहे. मुंबईत स्वतःचा व्यवसाय करतानाच त्यांनी ६० च्या दशकात गावात प्राथमिक शाळा, टपाल कार्यालयासह दळणवळणासाठी रस्त्याच्या निर्मितीसाठी प्रचंड मेहनत घेतली.
ग्रामपंचायत सदस्य, विद्यालयाच्या शाळा समितीचे उपाध्यक्ष, गावच्या देवस्थानाचे हिशेबनीस यांसह विविध भूमिका त्यांनी वेळोवेळी अत्यंत जबाबदारीने निभावल्या होत्या. वय आणि वेळेची तमा न बाळगता संकटात धावून जाणे आणि गरजवंताला मदत करणे हा त्यांचा स्थायिभाव होता. ते माजी आमदार कै. यशवंत एकनाथ पाटील यांच्या निकटवर्तीयांपैकी होते. तसेच माजी आमदार प्रमोद जठार यांच्याशीही त्यांचे जवळचे संबंध होते. राजकारणात सक्रिय असल्याने वैभववाडी तालुक्यासह गगनबावडा आणि राजापूर तालुक्यातील पाचल परिसरात त्यांचा मित्रपरिवार मोठा आहे.
गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती बरी नव्हती. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच वैभववाडी तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात आली. त्यांच्या अंत्ययात्रेला राजकीय, सामाजिक क्षेत्रातील अनेक लोक उपस्थित होते. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, तीन मुली, भाऊ, पुतणे, सूना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.










