तर बांधकाम खात्याविरुद्ध आंदोलन करावे लागेल

राष्ट्रवादीचे नेते एम. के. गावडे यांचा इशारा
Edited by: दिपेश परब
Published on: May 27, 2023 16:38 PM
views 100  views

      जिल्ह्यात २०२२- २३ मध्ये सार्वजनिक बांधकामकडे प्रचंड निधी उपलब्ध झाला. सर्व रस्ते डांबरीकरण झाले. याबद्दल  जिल्ह्याचे पालकमंत्री व बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे अभिनंदन आहे. मात्र रस्त्याचे डांबरीकरण होत असताना बाजूची साईडपट्टी किंवा गटार होणे आवश्यक होते मात्र हे काम झालेले दिसत नाही. साईडपट्टी व गटार नसल्याने उद्याच्या पावसाळ्यात सर्व पाणी हे रस्त्यावर येणार आहे. आणि त्यामुळे गणपतीपर्यंतचेच  रस्त्याचे डांबरीकरण झाले होते का हे शोधावे लागणार असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते एम. के. गावडे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली आहे.

     सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता वेंगुर्ला कार्यालयात कधीच सापडत नाहीत. किंवा रस्त्याचे काम होत असताना कार्यालयीन माणूस साईट वर दिसत नाही. त्यामुळे झालेल्या कामाची प्रत कोणी चेक करावी? आमच्या मते भ्रष्टाचारात महसुलाच्या पुढे सार्वजनिक बांधकामचा कदाचित नंबर लागेल. राज्य महामार्गाच्या दोन्ही बाजूला प्रचंड प्रमाणात अनधिकृत बांधकाम झाले आहे. शासकीय नियम सोडून ही बांधकामे झाली आहेत. रस्त्याच्या दुतर्फा असलेले इमारती चे पाणी थेट रस्त्यावर सोडले आहे तरी सुद्धा बांधकाम खात्याचे याकडे लक्ष नाही. त्यामुळे शासनाने कितीही रुपये खर्च केले तरी नागरिकांना सुविधा मिळणे अशक्य आहे. यामुळे संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी होऊन कारवाई होणे आवश्यक आहे. दरम्यान पावसापूर्वी शासनाने याकडे लक्ष न दिल्यास बांधकाम खात्याविरुद्ध आंदोलन करावे लागेल असा इशारा एम. के. गावडे यांनी दिला आहे. यावेळी राष्ट्रवादीच्या महिला नेत्या प्रज्ञा परब, तालुकाध्यक्ष योगेश कुबल, शहराध्यक्ष सत्यवान साटेलकर आदी उपस्थित होते.