
दापोली : दापोली नगरपंचायत हद्दीतील शिवाजीनगर परिसरातील लाल कट्टा ते नगरपंचायत कार्यालयाच्या मागील भागातील नाल्याच्या दोन्ही बाजूंना कॉंक्रीटची संरक्षक भिंत व तळाशी कॉंक्रीटचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात आले. या कामात नाल्याची रुंदी कमी करण्यात आली असल्याने येत्या पावसाळ्यात नगरपंचायतीच्या आवारात तसेच कर्मचारी वसाहतीत या नाल्यातील पाणी घुसून पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याचे पत्र दापोलीच्या नगराध्यक्ष ममता मोरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे.
दापोली शहरातील शिवाजीनगर येथील लाल कट्टा ते आसर्याचा पूल या दरम्यान असलेल्या नाल्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येत असून या कामात नाल्याची रुंदी कमी करण्यात आल्याने नाल्याचे पात्र अरुंद झाले आहे. त्यामुळे येत्या पावसाळ्यात नाल्यातील पाणी कोकण कृषी विद्यापीठ वसाहत व दापोली नगरपंचायतिच्या आवारात येवून पूरपरिस्थिती निर्माण होणार आहे. यासंदर्भात ४ मार्च रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दापोली कार्यालयात पत्रव्यवहार करूनही हे काम अजून सुरूच आहे. त्यामुळे येणाऱ्या पूर परिस्थितीला सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार असेल असा इशारा नगराध्यक्ष ममता मोरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना एका पत्राद्वारे दिला आहे.