....तर रेल्वे रूळावर बसून आंदोलन, प्रवासी संघटनेचा इशारा

आंदोलन तात्पुरते स्थगित !
Edited by: विनायक गांवस
Published on: August 16, 2024 07:07 AM
views 466  views

सावंतवाडी : येथील अपूर्ण रेल्वेचे टर्मिनस मार्गी लागावे, येथे सुपरफास्ट गाड्यांना थांबा मिळण्याबरोबरच कोरोना काळात काढून घेण्यात आलेले थांबे पूर्ववत करावे, सावंतवाडी स्थानकाचे नामकरण करावे आदी मागण्यांसाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी तर्फे पुकारण्यात आलेले घंटानाद आंदोलन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा आश्वासनांअंती तात्पुरते स्थगित करण्यात आले. तर मागण्या केल्या नाहीत तर गणेशोत्सवाच्या तोंडावर सावंतवाडी स्थानकावर हजारोच्या संख्येने रेल्वे रुळावर बसून आंदोलन करू असा इशारा संघटनेकडून देण्यात आला.

कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी तर्फे गेल्या अडीच वर्षात सावंतवाडी स्थानकातील अपूर्ण प्रवासी सुविधा आणि रेल्वेचे अपूर्ण असणारे टर्मिनस पूर्ण करण्यात यावे यासाठी विविध प्रयत्न करण्यात आले होते. २६ जानेवारी २०२४ ला प्रवासी संघटना सावंतवाडीने आपल्या सलग्न संस्थांना सोबत घेऊन हजारो लोकांचा उपस्थितीत एकदिवसीय लाक्षणिक आंदोलन केले होते. तरी देखील शासन आणि प्रशासनाकडून कोणतीही दखल व हालचाल केली गेली नव्हती. परंतु पुन्हा संघटनेने आंदोलन पुकारल्यानंतर लगेच सावंतवाडी स्थानकातील PRS सुविधा ही १२ तास करण्यात आली. तसेच घंटानाद आंदोलनात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी टर्मिनसला लागणारे पाणी हे तिलारी धरणातून जल जीवन मिशन अंतर्गत मिळेल त्यासाठी  ७ कोटी मंजूर आहेत तसेच येथील प्रस्तावित रेलोटेल लवकरच पूर्ण करण्यात येईल आणि टर्मिनस साठी लागणाऱ्या रस्त्याला जिल्हा नियोजन मधून ३ कोटी मंजूर झाले असल्याची माहिती दिली. तसेच येथील रेल्वे थांब्यासाठी पुढील आठवड्यात कोकण रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा यांच्याशी आपल्या अध्यक्षतेखाली संघटनेच्या शिष्टमंडळाची बैठक लावू असे सांगितले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, गजानन नाटेकर आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

त्यानंतर राजन तेली तसेच रुपेश राऊळ, मायकल डिसोझा यांनी देखील आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन आंदोलनकर्त्यांची बाजू समजून आपण आपल्या परीने पाठपुरावा करू असे सांगितले. याला प्रतिसाद म्हणून संघटनेचे अध्यक्ष ॲड संदीप निंबाळकर यांनी जर कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक लावली नाही आणि आमच्या मागण्या केल्या नाहीत तर गणेशोत्सवाच्या तोंडावर सावंतवाडी स्थानकावर हजारोच्या संख्येने रेल्वे रुळावर बसून आंदोलन करू असा इशारा दिला. यावेळी संघटनेचे सल्लागार बबन साळगावकर, बाळासाहेब बोर्डेकर, सचिव मिहिर मठकर, ॲड नकुल पार्सेकर, नरेंद्र तारी, माजी पंचायत सदस्य शांताराम गावडे, गुणाजी गावडे, भूषण बांदिवडेकर, सागर तळवडेकर,सुधीर राऊळ,सागर नानोसकर,गणेश चमणकर, प्रथमेश पाडगावकर, विनोद नाईक, अभिषेक शिंदे आदी संघटनेचे सदस्य उपस्थित होते.