जिल्ह्यात एवढे आढळले डेंग्यूचे रुग्ण..!

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: September 29, 2023 18:01 PM
views 617  views

कुडाळ | प्रसाद पाताडे : सिंधुदुर्ग जिल्ह्यात डेंग्यू ची साथ सुरु असून १ सप्टेंबर पासून आतापर्यंत तब्बल 83 डेंग्युचे रुग्ण जिल्ह्यात आढळले आहेत. तर जानेवारी पासून 428 डेंग्युचे व 39 मलेरियाचे रुग्ण जिल्ह्यात आढळले आहेत. कणकवली तालुक्यात डेंग्यू बाधित सर्वाधिक 132 रुग्ण  सापडले आहेत. तर दोडामार्ग तालुक्यात मलेरिया बाधित सर्वाधिक 22 रुग्ण सापडले आहेत अशी अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डेंगूची साथ रोखण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागामार्फत विविध उपायोजना केल्या जात आहेत. जिल्ह्यात जानेवारीपासून आतापर्यंत 428 डेंगू चे रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी तब्बल 83 रुग्ण हे 1 सप्टेंबर पासून गेल्या 28 दिवसात आढळले आहेत.डेंग्यू रुग्ण संखेत वाढ होत असल्याने आरोग्य विभागामार्फत दैनंदिन ताप सर्वेक्षण, कीटक शास्त्रीय सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या सर्वेक्षणात ऑगस्ट पासून डेंगूची साथ झपाट्याने वाढत असल्याचे दिसून आले आहे. जिल्ह्यात डेंग्यू बाधित रुग्ण आढळलेल्या गावात विविध उपयोजना सुरू करण्यात आल्या आहेत. तसेच दैनंदिन ताप सर्वेक्षण करून दूषित रुग्णांचा शोध घेतला जात आहे. संशयित रुग्णांचे रक्त नमुने जिल्हा रुग्णालय येथील प्रयोग शाळेत तपासले जात आहेत.आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत डास उत्पत्ती रोखण्यासाठीच्या उपाययोजना तात्काळ सुरू करण्यात आल्या आहेत. डेंगू ची साथ रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना व सर्व तालुक्यात आवश्यक औषध साठा उपलब्ध करून ठेवण्यात आला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

तालुका निहाय डेंग्यू बाधित रुग्णसंख्या (जानेवारी पासून)

दोडामार्ग 44, कणकवली 132, कुडाळ 78, मालवण 45,सावंतवाडी ५१ वैभववाडी 25, वेंगुर्ला 37  देवगड 15 असे एकूण 428 रुग्ण जानेवारी 2023 पासून आतापर्यंत सापडले आहेत .

मलेरियाचे 39 रुग्ण

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मलेरियाची साथ आटोक्यात असून जानेवारी 2023 पासून आतापर्यंत 39  रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी गेल्या 28 दिवसात सप्टेंबर मध्ये 10 रुग्ण नव्याने आढळले आहेत .

लक्षणे दिसताच आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधा

जिल्ह्यात डेंगूंच्या रुग्णांमध्ये वाढ झाली असून  जिल्ह्यातील डेंग्युची साथ आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणा प्रयत्नशील आहे. मात्र आरोग्य विभागामार्फत देण्यात येणाऱ्या सूचनांचे जनतेने काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. परिसर स्वच्छ ठेवणे ,आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळणे, परिसरात पाणी साचू न देणे, कोणत्याही तापाची लक्षणे दिसतात तात्काळ आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधणे, याबाबत जनतेने काळजी घेणे अपेक्षित आहे असं  आवाहन डॉ. रमेश कर्तसकर,  जिल्हा हिवताप अधिकारी सिंधुदुर्ग यांनी केलं आहे.