तर करेक्ट कार्यक्रम करू..!

ओबीसी समाजासह इतर आरक्षित समाजाचा इशारा
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: June 21, 2024 14:06 PM
views 135  views

सिंधुदुर्गनगरी : जरांगे पाटील यांना पाठीशी घालण्यासाठी किंवा एखाद्या समाजाचे लांगुलचलन करण्यासाठी जर आमच्या 52 टक्के आरक्षणातून कुणाला आरक्षण देण्याचा शासनाने निर्णय घेतला तर, आम्ही गप्प बसणार नाही. त्या निर्णयाला सर्वतोपरी विरोध करू. प्रसंगी रस्त्यावर उतरून मोठी आंदोलने उभारू. अशी भूमिका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओबीसी तसेच इतर आरक्षित 52% समाजातील लोकांनी घेतली आहे.  शुक्रवारी त्यांनी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची भेट घेऊन तसे निवेदन दिले आहे. यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सध्या पदवीधर मतदार संघाची निवडणूक असून, पदवीधर निवडणुकीसाठी उभे असलेल्या उमेदवारांनी याबाबतची आपली भूमिका स्पष्ट करावी नाहीतर आम्ही सर्व मिळून करेक्ट कार्यक्रम करू असा इशारा दिला आहे.

जरांगे पाटील यांनी पुन्हा सुरू केलेल्या उपोषणानंतर ओबीसी समाजासह इतर आरक्षित समाज आक्रमक झाला आहे. आमच्या 52 टक्के आरक्षणाला कोणताही धक्का न लागता इतर कुणालाही आरक्षण  देण्यास आमची हरकत नाही. मात्र आमच्या 52 टक्के आरक्षणाला हात लावू देणार नाही अशी भूमिका या सर्वांनी घेतली आहे. याबाबतचे लेखी निवेदन सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी व आरक्षित समाज महासंघ यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना दिले आहे.याच बरोबर प्रा . लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे व मंगेश ससाणे यांच्या उपोषणाला पाठिंबा देत असल्याबाबतचे पत्रही दिले आहे.या निवेदनानंतर पत्रकारांशी बोलताना या महासंघाचे अध्यक्ष नितीन वाळके यांनी जर शासनाने जरांगे पाटील यांना पाठीशी घालण्यासाठी किंवा एखाद्या समाजाचे लांगुलचालन करून मते मिळवण्यासाठी असा कोणताही प्रयत्न केला तर आम्ही गप्प बसणार नाही. आमचे 52 टक्के आरक्षण सोडून इतर मध्ये आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. असे सांगतानाच आमच्या आरक्षणाला हात लागल्यास आम्ही तीव्र आंदोलन करू असा इशारा दिला आहे. आत्ता पदवीधर मतदारसंघाची निवडणूक सुरू आहे. या निवडणुकीमध्ये ज्या पक्षांचे उमेदवार उभे आहेत त्यांनी या आरक्षणाबाबतची आपली भूमिका स्पष्ट करावी. अन्यथा त्यांचा आपण करेक्ट कार्यक्रम करून आणि यापुढेही प्रत्येक निवडणुकीत आम्ही आमची ताकद दाखऊ असा इशारा दिला आहे. याचबरोबर ओबीसी तसेच आरक्षित समाजाच्या समस्या मार्गी लावण्यासाठी यापुढे आपण सातत्याने प्रयत्न करणार असून, त्याबाबतची निवेदनही जिल्हाधिकाऱ्यांना दिली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी महासंघाचे महासचिव नंदन वेंगुर्लेकर, खजिनदार बाळासाहेब बोर्डेकर, सुनील भोगटे, काका कुडाळकर, वसंत केसरकर,जिजी उपरकर, रमण वायंग, चंद्रकांत कुंभार, महेश परुळेकर, भरत आवळे, सत्यवान साठेलकर, संदीप कदम,चंद्रशेखर उपरकर, आनंद मिस्त्री निलेश कामतेकर साईनाथ आंबेडकर आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.