....तर वैद्यकीय अधिक्षकांच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन : पुंडलिक दळवी

आरोग्य प्रश्नावरून दोन राष्ट्रवादीत जुंपली
Edited by: विनायक गावस
Published on: November 25, 2023 13:18 PM
views 282  views

सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाच्या शिष्टमंडळाने तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय अधिक्षक डॉ. ज्ञानेश्वर ऐवळे यांची भेट घेतली. यावेळी आरोग्याच्या दुरावस्थेसह रिक्तपदांबाबत त्यांनी चर्चा केली. उपजिल्हा रुग्णालय, सावंतवाडी येथे बरीच रिक्त पदे आहेत. सध्यस्थितीत नेमलेले वैद्यकीय अधिकारी तसेच कर्मचारी हे पुर्ण वेळ नसल्यामुळे याचा फटका रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना बसत आहे असं मत पुंडलिक दळवी यांनी व्यक्त केले. रुग्णालयातील रिक्तपदे तसेच वैद्यकीय सोई सुविधा येत्या पंधरा दिवसात पुर्तता करावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून वैद्यकीय अधिक्षकांच्या कार्यालया समोर तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला.

ते म्हणाले, कॅज्युअल्टी विभागात दाखल झालेल्या रुग्णांना प्रथमिक उपचार देत त्वरीत इतरत्र खाजगी रुग्णालयात किंवा गोवा बांबुळी येथे हलविण्यास सांगण्यात येते. हे सर्वसामान्य तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या जनतेला परवडणारे नसल्याने रुग्णांची हेळसांड होवून बरेच रुग्ण उपचाराअभावी दगावतात. त्याचप्रमाणे सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात औषधांचा अपुरा साठा असल्याने उपचार घेत असलेल्या रुग्णांना बाहेरुन औषधे आणण्यास सांगण्यात येते. यामुळे सर्वसामान्य तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या जनतेला आर्थिक भुर्दंड व त्रास सोसावा लागत आहे. सर्वसामान्य जनतेला खाजगी रुग्णालयात जावून उपचार घेणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसल्याने त्यांना सरकारी रुग्णालयांशिवाय पर्याय नसतो. रुग्णालयातील अस्वच्छता, स्वच्छता गृहामध्ये पाणी नसणे यामुळे रुग्णांचे व नातेवाईकांचे हाल होतात. रुग्णांना सेवा देणारे वॉर्ड स्टाफच्या कमतरतेमुळे उपचार घेत असलेल्या रुग्णांना सामान्य सोईसुविधा सुद्धा पुरविल्या जात नाहीत. या सर्व बाबींचा विचार करुन सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रिक्तपदे तसेच वैद्यकीय सोई सुविधा येत्या पंधरा दिवसात पुर्तता करावी अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून वैद्यकीय अधिक्षकांच्या कार्यालया समोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याची पुर्ण जबाबदारी अधिक्षकांची राहील असा इशारा पुंडलिक दळवी यांनी दिला.

दरम्यान, राष्ट्रवादीची आरोग्यमंत्री असताना तुम्ही का पाठपुरावा केला नाही असा सवाल राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजू धारपवार यांनी केला होता. त्याबाबत विचारले असता पुंडलिक दळवी म्हणाले, आमचं सरकार असताना आरोग्यमंत्री डॉ राजेश टोपे दिवसरात्र काम करत होते. कोरोनासारखी परिस्थिती असताना केलेलं काम अतुलनीय आहे. आताच सरकार आरोग्य विभाग सांभाळण्यात अपयशी ठरलं आहे. आमचे मंत्री असताना आम्ही पाठपुरावा केला. चांगली सेवा रूग्णांना देण्याचा प्रयत्न केला असा खुलासा पुंडलिक दळवी यांनी केला‌.

यावेळी तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, शहर अध्यक्ष देवेंद्र टेमकर,तालुका सरचिटणीस हिदायतुल्ला खान, महिला शहराध्यक्ष सायली दुभाषी, अल्पसंख्यांक जिल्हा उपाध्यक्ष एफ्तेकर राजगुरू, शहर चिटणीस राकेश नेवगी, अल्पसंख्यांक तालुकाध्यक्ष जावेद शेख,तालुका उपाध्यक्ष याकुब शेख, युवक उपाध्यक्ष रुपेश राठोड आदी उपस्थित होते.