
सावंतवाडी : सावंतवाडी रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरण कामाचा शुभारंभ आज पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते होत आहे. या फलकावर 'सावंतवाडी रेल्वे टर्मिनस' ऐवजी 'सावंतवाडी रोड' असा फलक लावल्यानं रेल्वे प्रवासी संघटनेने आक्षेप घेत मंत्री रवींद्र चव्हाण व प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. यासह इतर मागण्यांबाबत कार्यवाही न झाल्यास 'घंटानाद' आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. याबाबत सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड संदीप निंबाळकर, सचिव मिहीर मठकर, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, सागर तळवडेकर आदींनी सार्वजनिक बांधकाम मंत्री, कोकण रेल्वे व्यवस्थापकीय संचालक, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी आदींचे लक्ष वेधले आहे. सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे भूमिपूजन २७ जून २०१५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते तर पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत आणि मान्यवरांच्या उपस्थितीत झाले आहे. त्यानंतर पहिल्या टप्प्यातील कामे पूर्ण झाली आहेत. त्यावेळी "सावंतवाडी रेल्वे टर्मिनस" नावाची भूमिपूजन कोनशिला आवारात बसविण्यात आली आहे. दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने बाह्य सुशोभीकरण केले. तेथे "सावंतवाडी रोड" अशा स्वरूपाचा सुशोभीकरणानंतर फलक लावण्यात आलेला आहे. त्याठिकाणी ''सावंतवाडी रेल्वे टर्मिनस'' असा फलक लावण्याची मागणी संघटनेन केली आहे. आज पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत याचा शुभारंभ होणार आहे. त्यामुळे प्रशासनाकडून कोणती कार्यवाही होते याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, सावंतवाडी रेल्वे टर्मिनसला कोकण रेल्वेचे शिल्पकार ''प्रा. मधु दंडवते'' यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी सातत्याने जनतेतून होत आहे. त्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. तसेच सावंतवाडी रेल्वे टर्मिनस दर्जाची कामे व्हावीत. तसेच अधिकच्या रेल्वे गाड्यांना थांबा, पाणी भरण्याची सुविधा आणि इतर प्रवासी सुविधांची निर्मिती झाली पाहिजे. त्यासाठी कोकण रेल्वे महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना स्वतंत्र निवेदन दिलीत. रेल्वे स्थानकाच्या प्रवेश द्वारावरील त्या फलकावरील नावाची दुरुस्ती करून 'सावंतवाडी टर्मिनस' असे करावे अशीही मागणी केली आहे. वरील मागण्यांची पूर्तता न केल्यास येत्या १५ ऑगस्टला 'घंटानाद' आंदोलन छेडण्याचा इशारा रेल्वे प्रवासी संघटनेकडून देण्यात आला आहे.
सद्यस्थितीत, रेल्वे स्थानकावर 'सावंतवाडी रोड' असा फलक लावल्यानं २०१५ ला तत्कालीन मंत्र्यांच्या उपस्थितीत 'सावंतवाडी रेल्वे टर्मिनस' भुमिपूजनाची लागलेली कोनशीला कशासाठी होती हा प्रश्न सर्वसामान्यांतून उपस्थित होतोय. तर फलकावरील नाव बदललं न गेल्यास 'रेल्वे टर्मिनस' चा भुमिपूजन एव्हेंट करुन सावंतवाडीकरांची दिशाभूल तर केली गेली नसेल ना ? अशी शंका जनतेतून उपस्थित केली जात आहे.