
वेंगुर्ला : शिरोडा वेळागरवाडी येथील अल्पभूधारक गरीब शेतकऱ्यांवर ताज प्रकल्पाच्या नावाखाली १९९० पासून शासनाकडून अन्याय झाल्याचा आरोप करत, ताज पर्यटन प्रकल्प संपादक क्षेत्रातून ९ हेक्टर क्षेत्र वगळण्याच्या मागणीसाठी येथील भूमीपुत्रांनी मुंबई आझाद मैदान येथे १५ ऑगस्ट रोजी आमरण उपोषण छेडले. त्याचवेळी येथील शिरोडा वेळागरवाडी शेतकरी संघटनेच्या वतीने येथील खाडीपत्रात पाण्यात उभे राहून अनोखे आंदोलन छेडण्यात आले.
यावेळी जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत अशा प्रकारचे आंदोलन सुरूच राहणार. पर्यायी जलसमाधी सुद्धा घ्यावी लागली तरी आम्ही मागे हटणार नसल्याचे यावेळी आंदोलनकर्त्या शेतकरी महिलांनी सांगितले. आम्हाला संबंधित ताज प्रकल्पाच्या पदाधिकाऱ्यांशी बोलून त्यांच्यासमोर हे प्रश्न मांडायचे आहेत. या प्रकल्पाला आमचा विरोध नाही. आमची फक्त ९ हेक्टर जागा वगळा हीच आमची मागणी आहे. असल्याचेही यावेकी संघटनेच्या वतीने सांगण्यात आले. तर जय जवान जय किसान, शिरोडा वेळागरवाडी शेतकरी संघटनेचा विजय असो, ९ हेक्टर वेगळा वेळागर वाचवा , आमची जमीन आमची माय, जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची असा घोषणा देऊन येथील खाडीपत्रात हे आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात शैलजा गवंडी, शारदा आरोस्कर, महिमा नाईक, भाग्यश्री गवंडी, वनिता आरोस्कर, रसिका आरोस्कर, प्रणाली आरोस्कर रामचंद्र आरोस्कर, प्रदीप आरोस्कर, उर्मिला आरोस्कर, विद्या आरोस्कर, मंजिली रेडकर, कुमुदिनी गवंडी, राजश्री आंदुर्लेकर, प्रिया गवंडी यांच्यासहित सुमारे ३० ते ३५ महिला पुरुष आंदोलक सहभागी झाले होते.
यावेळी या आंदोलनाला माजी आमदार राजन तेली यांनी भेट देत पाण्यात उतरून आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. त्यावेळी बोलताना राजन तेली म्हणाले, याठिकाणची १२० एकर पेक्षा जास्त जागा ही ताज प्रकल्पाला मिळणार आहे. ज्यावेळी शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळी ही जागा आरक्षित करून ताजला दिलेली होती. त्यानंतर ताजने कोणताही प्रकल्प या ठिकाणी केला नाही. यामुळे या शेतकऱ्यांचे ९ हेक्टर क्षेत्र वगळून उर्वरित जागेमध्ये त्यांनी हा प्रकल्प करावा. शेवटी स्थानिक लोकांना आपण प्रथम प्राधान्य दिलं पाहिजे. ताज सारखा आंतरराष्ट्रीय प्रकल्प या ठिकाणी यायला कोणाचाही विरोध नाही. लवकरच याबाबत बैठक पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांच्याकडे घेऊन त्यांच्याकडे यांची भूमिका मांडणार असल्याचे राजन तेली यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषद माजी आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ, शिरोडा माजी सरपंच मनोज उगवेकर, पेंडूर सरपंच संतोष गावडे, ग्रा प सदस्य रश्मी डीचोलकर, भाजप पदाधिकारी लक्ष्मीकांत कर्पे, श्रीकृष्ण धानजी, संतोष अणसूरकर, विद्याधर धानजी, चंद्रशेखर गाडेकर, राहुल गावडे, वासुदेव आरोस्कर आदी उपस्थित होते.
यावेळी दुपारी तहसीलदार ओंकार ओतारी, पोलिस निरीक्षक संदीप भोसले यांनी आंदोलकांना भेट देऊन त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली. तसेच जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी यांच्याशी मोबाईलद्वारे संपर्क साधून चर्चा केली. यावेळी मुंबई येथे याबाबत बैठक आयोजित करून या प्रश्नावर चर्चा केली जाणार आहे त्यामुळे आपण आरोग्याचा विचार करता हे आंदोलन मागे घ्यावे अशी विनंती केली. यानंतर शेतकऱ्यांच्या वतीने पाण्यात उभे राहून आंदोलन तात्पुरते स्थगित करून जर मुंबई येथील बैठकीत ९ हेक्टर क्षेत्र वगळण्या संदर्भात निर्णय न झाल्यास आता मुंबई येथे उपोषणास गेलेले तसेच आम्ही सर्व पुन्हा याठिकाणी जल आंदोलन करू असा इशारा दिला.
दीपक केसरकर यांचा हेकेखोरपणा : राजन तेली
या ठिकाणच्या स्थानिक आमदारांच्या हेकेखोरपणामुळे हा प्रश्न आतापर्यंत प्रलंबित राहिलेला आहे. यामुळे माझी शासनाला विनंती आहे की, तुम्ही नुसतं दीपक केसरकर यांच्यावर भरोसा न ठेवता या प्रश्नावर गांभीर्याने विचार करा. केसरकर यांनी आता कुठेतरी एक पाऊल मागे यावं आणि लोकांचा ऐकावं. राज्यात एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सरकार सुरू आहे आणि ही सर्व माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवायला दीपक केसरकर देत नाहीत असा आरोप दीपक केसरकर यांच्यावर राजन तेली यांनी यावेळी केला . तर पालकमंत्री यांच्या जनता दरबारात सुद्धा ही भूमिका आता गेलेली आहे. त्यांच्या माध्यमातून ही भूमिका राज्याच्या प्रमुखापर्यंत पोहोचवली जाईल. आणि यांना न्याय कसा मिळेल या दृष्टिकोनातून आम्ही सर्व प्रयत्न केले जातील असेही तेली यांनी यावेळी सांगितले.