
सिंधुदुर्गनगरी : येत्या 15 जुलै 2025 रोजी साजरा होणाऱ्या "जागतिक युवा कौशल्य दिना"निमित्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर, सिंधुदुर्ग यांच्या वतीने "कौशल्य सप्ताह" (दि. 7 ते 15 जुलै 2025) दरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी अ.ई. तडवी यांनी दिली आहे.
या उपक्रमांतर्गत दि. ८ जुलै २०२५ रोजी जन शिक्षण संस्था, सिंधुदुर्ग यांच्या वतीने वर्ष २०२५ च्या पहिल्या कौशल्य विकास बॅच "सहायक ड्रेस मेकर" या प्रशिक्षण बॅचचा उद्घाटन समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
या समारंभासाठी प्रमुख अतिथी कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सहायक आयुक्त,भैयाजी येरमे, तसेच कौशल्य विकास व रोजगार अधिकारी सूरज देबाजे व भारत सरकार श्रम व रोजगार मंत्रालय, समुपदेशक निखिल दवणे आदी मान्यवर व विद्यार्थी उपस्थिती होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जन शिक्षण संस्थान, सिंधुदुर्गचे संचालक सुधीर पालव यांनी केले आणि प्रशिक्षण बॅचचे औपचारिक उद्घाटन केले.
कार्यक्रमात सहभागी प्रशिक्षणार्थीना मार्गदर्शन करताना श्री. येरमे यांनी कौशल्य विकास, रोजगार संधी, तसेच स्वयंरोजगार याबाबत उपयुक्त माहिती दिली. शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, प्रशिक्षणांमधून मिळणारे कौशल्य आणि त्या आधारे निर्माण होणाऱ्या संधींबाबत माहिती देऊन प्रशिक्षणार्थीमध्ये नवीन आत्मविश्वास आणि प्रेरणा निर्माण केली.
उपस्थित उमेदवारांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आणि भविष्यातील करिअरसाठी योग्य दिशादर्शन झाल्याचे समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी श्री. येरमे यांनी सर्व प्रशिक्षणार्थीना यशस्वी भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.