सिंधुदुर्गच 'पालकत्व' पुन्हा राणेंकडे..?

नितेश राणेंची वर्णी जवळपास निश्चित !
Edited by:
Published on: December 16, 2024 16:07 PM
views 1067  views

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र राज्याच्या नव्या सरकारमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली विधानसभा मतदारसंघाचे भाजपा आमदार नितेश राणे यांनी पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. हिंदुत्ववादी नेते अशी ओळख मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून दिल्यानतंर कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एकमेव कॅबिनेट मंत्री असणारे नितेश राणेंची जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी वर्णी लागणार हे जवळपास निश्चित आहे. तब्बल दहा वर्षांनी राणेंकडे पुन्हा जिल्ह्याच पालकत्व येणार असून पाच वर्षांनी स्थानिक आमदाराला जिल्ह्याचा पालकमंत्री होण्याचा बहुमान मिळणार आहे. 

जिल्ह्यात मागील ३० वर्षांत नारायण राणे, दीपक केसरकर, उदय सामंत, रवींद्र चव्हाण आदींनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद भूषविले आहे. या सर्वांनी पालकमंत्री पदाची जबाबदारी सांभाळताना चांगले काम केले आहे. यावेळी विधानसभा निवडणूकीत कणकवलीतून नितेश राणे यांना सलग तिसर्‍यांदा निवडून दिले आहे. त्यात हिंदुत्ववादी नेते अशी ओळख असणाऱ्या नितेश राणेंची कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाली आहे. जिल्ह्यातून एकमेव कॅबिनेट मंत्री असणारे नितेश राणेंची जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी वर्णी लागणार हे जवळपास निश्चित आहे. त्यात माजी पालकमंत्री रविंद्र चव्हाण व दीपक केसरकर यांचा यावेळीच्या मंत्रिमंडळात समावेश नाही आहे. त्यामुळे तब्बल दहा वर्षांनी पुन्हा एकदा जिल्ह्याच पालकत्व राणेंकडे येणार आहे. एवढंच नव्हे तर जवळपास पाच वर्षांनी स्थानिक आमदार जिल्ह्याचा पालकमंत्री होणार आहे.

१९९० ला नारायण राणे पहिल्यांदा आमदार म्हणून विधानसभेत गेले. १९९६ ला युती सरकारमध्ये ते पहिल्यांदा कॅबिनेट मंत्रीपदी विराजमान झाले. १९९९ मध्ये राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली. २००५ ला शिवसेना सोडल्यानंतर कॉग्रेसमधून ते आमदार झाले. १९९६ ते ९९ या कार्यकाळात जिल्ह्याच पालकमंत्रीपद नारायण राणेंकडे होत. २००५ पासून सलग २०१४ पर्यंत नारायण राणे पालकमंत्री होते. यानंतर दीपक केसरकर पाच वर्ष पालकमंत्री राहीले. २०१९ नंतरच्या दोन सरकारमध्ये सिंधुदुर्गचे सुपुत्र, रत्नागिरीचे आमदार उदय सामंत व त्यानंतर सिंधुदुर्गचे सुपुत्र, डोंबिवलीचे आमदार रविंद्र चव्हाण पालकमंत्री राहीले. २०२४ ला हे पद पुन्हा एकदा राणेंकडे जाणार हे निश्चित झाले आहे. तब्बल दहा वर्षांनी पुन्हा एकदा जिल्ह्याच पालकत्व राणेंकडे येणार आहे. 

कणकवली मतदारसंघातून हॅट्ट्रिक केल्यानंतर नितेश राणेंनी मंत्रीपदाला गवसणी घातली आहे. २०१४ मध्ये कणकवली मतदारसंघातून राष्ट्रीय काँग्रेस कडून ते प्रथमच आमदार झाले. त्यानंतर २००१९ व आता असे दोन वेळा ते भाजपमधून विजयी झाले आहेत. विशेष म्हणजे कोकणातून विजयी झालेले ते भाजपचे एकमेव आमदार आहेत. मंत्री बनलेले नितेश राणे हे आता कणकवली मतदारसंघाच्या नेतृत्वासह जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहणार आहेत हे जवळपास निश्चित झाले आहे. पूर्वीचा देवगड व आत्ताचा कणकवली मतदारसंघाचा इतिहास पाहता कै.आप्पा गोगटे, अजित गोगटे, प्रमोद जठार इथपर्यंत भाजपाचे आमदार निवडून आले. मात्र, येथील आमदार नेहमीच विरोधी पक्षात असायचा. २०१४ ला नितेश राणे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्यानंतर राज्यात भाजपची सत्ता आली आणि पुन्हा एकदा विरोधी पक्षात या मतदारसंघाला बसावे लागले. त्यानंतर २०१९ साली भाजपमधून राणे निवडून आले. यावेळी युतीचा सत्ता बसणार हे निश्चित असताना राजकीय उलथापालथीनंतर या मतदारसंघातील आमदाराला पुन्हा विरोधात बसावे लागले. मात्र, त्यानंतर झालेल्या शिंदेंच्या बंडानंतर या मतदारसंघाला अच्छे दिन आले. सत्तेत बसताच  मतदारसंघातील आपली पकड राणेंनी मजबूत केली. हिंदुत्ववादी विचार घेऊन राज्यात पकड निर्माण केली. सलग तिसऱ्यांदा मोठया मताधिक्याने ते विजयी झाले. अन् मंत्रीपदाची शपथ घेत कणकवली मतदारसंघाचा इतिहास त्यांनी पुसून टाकला आहे.