आकाशवाणी सिंधुदुर्गनगरी केंद्रामध्ये हिंदी भाषा पंधरवडा

निबंध स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद
Edited by: निलेश ओरोसकर
Published on: October 17, 2025 18:56 PM
views 81  views

सिंधुदुर्ग : आकाशवाणीच्या वतीने अलीकडेच १४ सप्टेंबर ते  ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत हिंदी भाषा पंडरवड्याचे आयोजन करण्यात आले होते. आकाशवाणी सिंधुदुर्गनगरी केंद्रामध्ये सुद्धा विविध उपक्रम राबवून हा हिंदी भाषा पंधरवडा साजरा करण्यात आला. त्याची सांगता अलीकडेच आकाशवाणी सिंधुदुर्गनगरी मध्ये करण्यात आली. यावेळी घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषके देऊन गौरविण्यात आले. 

आकाशवाणीच्या वतीने दरवर्षी हिंदी भाषेला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने हिंदी भाषा पंधरवडा साजरा करण्यात येतो. आकाशवाणी सिंधुदुर्गनगरी मध्ये सुद्धा हा पंधरवडा साजरा करण्यात आला. त्याची सांगता अलीकडेच झाली. या कार्यक्रमाला सहाय्यक संचालक (राजभाषा) पियुष गौतम, सहायक संचालक (कार्यक्रम) डॉ. सुनील गायकवाड, सहायक संचालक (अभियांत्रिकी) संजय खाडे,  अभियांत्रिकी प्रमुख मोहन कावळे, प्रकाश वराडकर, उत्तम शिंदे उपस्थित होते.

हिंदी भाषा पंधरवड्याच्या निमित्ताने आकाशवाणी सिंधुदुर्गनगरी केंद्रामध्ये हिंदी निबंध स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये अधिकारी आणि हंगामी निवेदक व कर्मचारी यांनी  उत्स्फूर्त सहभाग घेतला.  अधिकऱ्यांमधून अभियांत्रिकी प्रमुख मोहन कावळे यांनी प्रथम, उत्तम शिंदे यांनी द्वितीय, प्रकाश वराडकर यांनी तृतीय तर ज्ञानदेव परब यांचा उत्तेजनार्थ क्रमांक मिळाला. हंगामी निवेदक आणि कर्मचारी यामधून  निवेदक सौ. शिल्पा निगुडकर प्रथम, हंगामी कर्मचारी सौ. अर्चना वालावलकर आणि हंगामी निवेदक सौ. नेत्रप्रभा दळवी यांना द्वितीय तर हंगामी कर्मचारी प्रणाली परब यांचा तिसरा क्रमांक मिळाला. या सर्वाना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. 

यावेळी डॉ. सुनील गायकवाड म्हणाले, कोणत्याही भाषेमध्ये बोलताना  शब्दांचा योग्य वापर करा. शब्द दुधारी तलवार आहे. मातृभाषेबरोबर दोन इतर भाषा शिकल्या पाहिजेत. त्यामुळे शब्द संग्रह वाढतो. भारतीय रेल्वे हि हिंदी भाषा प्रचाराचे मोठे साधन आहे असे सांगून डॉ. गायकवाड यांनी  हिंदी प्रति आवड वाढण्यासाठी अशा स्पर्धा घेतल्या जातात, हे कौतुकास्पद असल्याचे सांगितले. पियुष गौतम यांनी सुद्धा सर्व स्पर्धकांचे अभिनंदन करून प्रेरणा, प्रोत्साहन आणि पुरस्कार या तीन सूत्रीवर हिंदी भाषा दिवस साजरा केला जातो, असे सांगितले. संजय खाडे म्हणाले, देशात एक भाषा कॉमन हवी. तशी हिंदी भाषा आहे. पंधरवडा पुरते हिंदीकडे लक्ष देऊ नका. प्रत्येक वेळी लक्षत ठेवा की आपली राष्ट्रभाषा हिंदी आहे. हिंदी भाषा सरळ आणि सोपी आहे. त्याचा वापर करत राहा. रेडियोवरचे हिंदी कार्यक्रम ऐका.  किसान चॅनेल बघा. हिंदी सुधारेल, असे आवाहन त्यांनी केले. 

यावेळी पियुष गौतम यांनी सर्वाना हिंदी भाषेची शपथ दिली. या कार्यक्रमाला मोहन कावळे, उत्तम शिंदे, प्रकाश वराडकर, अर्चना वालावलकर, प्रणाली परब, दुर्वा चव्हाण, कोमल सावंत, निकिता साळसकर, प्राची सावंत, शिल्पा निगुडकर, सचिन दर्पे, गीतांजली जाधव, नेत्रप्रभा दळवी, संजीवनी पाल्येकर, श्रीकृष्ण कदम, सीताराम चव्हाण, निलेश जोशी उपस्थित होते. सूत्रसंचालन निलेश कारेकर यांनी केले.