
सिंधुदुर्गनगरी : राज्य मंत्रिमंडळाच्या ३ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या बैठकीत कारखाने कायदा अधिनियम १९४८ आणि दुकाने व व्यापारी आस्थापना अधिनियम यामध्ये दुरुस्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. या दुरुस्तीमुळे कामगारांच्या कामाच्या तासांत बदल होणार असून, सरकारच्या या निर्णयाला भारतीय मजदूर संघाने तीव्र विरोध दर्शविला आहे. याबाबत आज जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करण्यात आले असून कामगारांच्या कामांच्या तासात बदल करणारा निर्णय मागे घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा दिला आहे.
सरकारच्या भूमिकेनुसार, बदलत्या औद्योगिक गरजा लक्षात घेऊन कारखाने व व्यापारी आस्थापनांमध्ये उत्पादनक्षमता वाढविणे, तसेच व्यवस्थापनाला लवचिकता देणे, हा या निर्णयामागील हेतू असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, यामुळे कामगारांच्या हितावर गदा येणार असून, त्यांच्या आरोग्य व सामाजिक आयुष्यावर परिणाम होईल, असा आरोप मजदूर संघाने केला आहे.
“हा निर्णय कामगारांच्या हिताविरुद्ध असून, मालकपक्षाचा फायदा होईल. कामगारांवर अतिरिक्त तासांचा ताण येणार आहे. त्यामुळे हा निर्णय तातडीने मागे घ्यावा असे निवेदन भारतीय मजदुर संघ सिंधुदुर्गच्या वतीने शासनाला देण्यात आले. यावेळी कोकण विभागीय संघटन मंत्री भगवान साटम, जिल्हाध्यक्ष सत्यविजय जाधव, प्राची परब, शुभांगी सावंत, दत्ताराम घाडीगावकर आदी उपस्थित होते.
अन्यथा आंदोलन छेडू
कामगारांच्या कामांच्या तासात बदल करणारा निर्णय शासनाने मागे घ्यावा भारतीय मजदुर संघ सिंधुदुर्गच्या वतीने अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा देण्यात आला आहे.










