
सावंतवाडी : शिक्षण विभाग व समग्र शिक्षा अभियान अंतर्गत राष्ट्रीय आविष्कार दौऱ्यानिमित्त गुजरात राज्यात अभ्यास दौऱ्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचा दौरा अविस्मरणीय ठरला आहे. दिनांक २४ ते २९ मार्च या कालावधीत संपन्न झालेल्या या अभ्यास दौऱ्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गुणवत्तापूर्ण असलेल्या २० शाळांमधील विद्यार्थ्यांची निवड झाली होती. या अभ्यास दौऱ्यात विद्यार्थ्यांनी गुजरात राज्यातील विविध पर्यटन स्थळांना भेटी दिल्या.
सदर अभ्यास दौऱ्यात जगातील सर्वात उंच असलेल्या सरदार वल्लभभाई पटेल 'स्टॅच्यू ऑफ युनिटी', नर्मदा नदीवरील सरदार सरोवर, स्वामीनारायण अक्षरधाम मंदीर, अहमदाबाद येथील सायन्स सिटी, साबरमती आश्रम, नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद, अटल सेतू अशा विविध पर्यटन स्थळांना भेटी देऊन विद्यार्थ्यांनी जाणून माहिती घेतली.
याचबरोबर गुजरात राज्यातील संस्कृती, लोकगीते खाद्यसंस्कृती, पोशाख व लोकजीवनाचाही अभ्यास या दौऱ्यात विद्यार्थ्यांनी अनुभवला. या अभ्यास दौऱ्यात गुजरातमधील गार्डनना भेट देऊन भूलभुलैया व विविध खेळांचा आस्वादही घेतला. 'फोर डी' चित्रपटाचाही आनंदही विद्यार्थ्यांनी लुटला. तसेच अटल सेतू पुलावर विद्यार्थ्यांनी डबल सायकल चालवत 'सायकल चालवा,पर्यावरण वाचवा!' असा संदेशही दिला. या दौऱ्यात सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शाळेतील संस्कृती गुरव, पार्थ दहिबावकर, रिषभ पाळेकर, सानिका गवस, सूरज नाईक, अदिती रासम, अन्वय शेटये, तपस्या दळवी, सांची पाटेकर, किरण कदम,
चैतन्य भोगले, प्रज्ञा मेस्त्री, तनिष्का राणे, अमोघ वालावलकर, शमिका कदम, श्रृती शिंदे, दुर्गेश तावडे, मनाली परब, सार्थक जामदार, मानवी पाटयेकर हे विद्यार्थी सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांसोबत कणकवली तालुक्यातील खारेपाटण शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक प्रदीप श्रावणकर, सावंतवाडी तालुक्यातील बांदा नं. १ केंद्रशाळेचे शिक्षक जे. डी. पाटील, ओरोस बुद्रुक नं. १ शाळेच्या शिक्षिका संगीता पाटयेकर हे मार्गदर्शक म्हणून या विद्यार्थ्यांसोबत होते. विद्यार्थी अभ्यास दौऱ्याहून परत सिंधुदुर्गनगरी येथील रेल्वे स्टेशनवर परतल्यावर पालक व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.
या अभ्यास दौऱ्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर (भाप्रसे) यांची प्रेरणा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांचे मार्गदर्शन व शुभेच्छामुळे दौरा यशस्वी झाला. अभ्यासदौरा यशस्वी करणेसाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी महेश धोत्रे व समग्र शिक्षा जिल्हा कार्यक्रम अधिकारी स्मिता नलावडे तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.