
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गात आक्षेपार्ह मजकूर वादाचा कारण ठरला होता. याप्रकरणी आता पोलिसांनी महत्वाचं आवाहन केलंय. आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणाऱ्यांवर आता थेट सिंधुदुर्ग पोलिसांकडून लक्ष ठेवण्यात येणार आहे. अशा घटना निदर्शनास आल्यास तात्काळ पोलिसांना कळवण्याचं आवाहन पोलीस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी केलंय. यासंदर्भातलं माहिती निवेदनाद्वारे देण्यात आलीय.
काय आहे निवेदनात ?
अयोध्या येथील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये whatsapp व्दारे जातीय / धार्मिक तेढ निर्माण करणारे आक्षेपार्ह मजकूर प्रसारीत करणाऱ्या व्यक्तीवर सिंधुदुर्ग पोलीस प्रशासनाच्यावतीने निगराणी ठेवण्यात येत आहे.
एखादी व्यक्ती अशा प्रकारे अफवा किंवा आक्षेपार्ह संदेश / छायाचित्र, खोट्या बातम्या whatsapp group वर प्रसारीत करीत असल्याचे आपल्या निदर्शनास आल्यास, त्याबाबतची माहिती पोलीस प्रशासनास देणे हे फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 39 नुसार आपले कर्तव्य आहे.
ज्या व्यक्ती सोशल मिडीयाचा वापर करुन whatsapp व्दारे आक्षेपार्ह संदेश / छायाचित्र / अफवा / खोट्या बातम्या प्रसारीत करून सामाजिक शांतता व सुव्यवस्थेत बाधा निर्माण करण्याचा प्रयत्न करतील, अशा व्यक्ती भारतीय दंड विधान 'संहिता कायदा कलम 505 (2) नुसार शिक्षेस पात्र आहेत.
त्या अनुषंगाने आपण whatsapp ग्रुप अँडमिन म्हणून whatsapp ग्रुप वरून कोणत्याही प्रकारचा आक्षेपार्ह संदेश / छायाचित्र / अफवा / खोट्या बातम्या प्रसारीत होणार नाही याची खबरदारी घेतली पाहीजे.
तसेच whatsapp व्दारे कोणी अशा प्रकारच्या अफवा किंवा आक्षेपार्ह संदेश / छायाचित्र, खोट्या बातम्या प्रसारीत करीत असल्याचे आपल्या निदर्शनास आल्यास त्याबाबतची माहिती जवळच्या पोलीस ठाणेस त्याचप्रमाणे पोलीस नियंत्रण कक्ष संपर्क क्रमांक 02362-228200 तसेच सायबर पोलीस ठाणे 02362-228214 वर तात्काळ द्यावी, असं आवाहन पोलीस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी दिली.










