सिंधुदुर्ग 'आरोग्यक्षम' करण्यासाठी नेते अॅक्शन मोडवर !

Edited by: विनायक गांवस
Published on: January 29, 2025 14:58 PM
views 252  views

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील समस्यांबाबत वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात आढावा बैठक झाली. या बैठकीत उपस्थित राहून पालकमंत्री नितेश राणे, माजी मंत्री दीपक केसरकर, आमदार निलेश राणे यांनी प्रलंबित प्रश्नांबाबत काही सूचना दिल्या.

वैद्यकीय महाविद्यालयास पुरेशी साधनसामुग्री पुरवावी तसेच रिक्त पदे, वर्ग तीन आणि वर्ग चार पदांची भरती पारदर्शी होण्याच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना कराव्यात. तसेच वैद्यकीय महाविद्यालयामध्ये नागरिकांना दर्जेदार उपचार मिळावेत यासाठी नियोजन करण्यात यावे. औषधांसाठी लागणारा निधी देण्यात यावा अशा सूचना पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या. 

यावर बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा, यंत्रसामुग्री, मनुष्यबळ तातडीने उपलब्ध करून द्यावे, नव्याने उभारण्यात येणाऱ्या इमारतींची कामे तातडीने मार्गी लावावीत, असे आदेश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. या बैठकीस पालकमंत्री नितेश राणे, माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर, ऑनलाइनद्वारे सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.