
सावंतवाडी : जिल्ह्यातील आरोग्य सेवेची सध्या दुरवस्था झाली असून विशेषतः सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना उपचारासाठी गोव्याला रेफर केल्यामुळे अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. सिंधुदुर्गनगरी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय कार्यरत असतानाही गोव्यात रेफर करण्याची वेळ आपल्यावर का येत आहे ? यावर शासनाने स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी जोर धरत आहे.
सावंतवाडीमध्ये मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल प्रस्तावित आहे. मात्र, या जागेसंदर्भातल प्रकरण प्रलंबित आहे. माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी समन्वयक म्हणून यात लक्ष घातले आहे. राजघराण्याने अटी आणि शर्तींवर आधारित एका करारावर सह्या केल्या आहेत. पण, उर्वरित एका सहीसाठी नवीन करार केला जाणार असल्याचे श्री. केसरकर यांनी सांगितले आहे. मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल सुरू होण्यास विलंब होणार असल्यामुळे, सध्याच्या उपजिल्हा रुग्णालयात ट्रॉमा केअर सेंटर सुरू करण्याची मागणी होत आहे.
जिल्ह्यात ओरोस येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय सुरू झाले आहे. या रुग्णालयाने जिल्ह्यातील रुग्णांची काळजी घेणे अपेक्षित आहे. मात्र, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील गंभीर रुग्णांना गोव्याच्या बांबोळी मेडिकल कॉलेजमध्ये पाठवले जात आहे. त्यामुळे रुग्णांची आणि त्यांच्या नातेवाईकांची मोठी गैरसोय होत आहे. ओरोस येथे रुग्णालय असतानाही रुग्णांना गोव्याला रेफर करण्याची नामुष्की का ओढावते याच आत्मचिंतन राज्य सरकार अन् लोकप्रतिनिधींनी करणं आवश्यक आहे. सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला तालुक्यांमधील आरोग्यसेवेची स्थिती गंभीर आहे. रुग्णांची संख्या वाढत असतानाही पुरेसे तज्ञ डॉक्टर उपलब्ध नाहीत. यामुळे वैद्यकीय सेवा कोलमडून पडली आहे. जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांमधील डॉक्टरांची आणि इतर कर्मचाऱ्यांची मंजूर पदे रिक्त आहेत. ही पदे तातडीने भरल्यास वैद्यकीय सेवेतील गोंधळ कमी होईल. त्यात नियुक्ती आदेश दिलेले डॉक्टर हजर होत नाहीत. डॉक्टरांना न मिळणारे अपेक्षित मानधन अन् भौतिक सुविधा त्याच कारण आहे.
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे असे महायुतीचे प्रमुख नेते आहेत. निलेश राणेंनी भर सभागृहात आरोग्य प्रश्नाच पोस्टमार्टम केलं होतं. त्यामुळे एकाच विचारांच्या या लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन रुग्णांची होणारी हेळसांड थांबवण्यासाठी पुढाकार घेण्याची मागणी होत आहे.
रुग्णालयांमधील रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी आणि आरोग्यसेवा अधिक सक्षम करण्यासाठी आरोग्य मंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याची गरज आहे.










