
सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाची उपसमिती असलेली सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटने मार्फत राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागांतर्गत असलेल्या जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, सिंधुदुर्ग म्हणजे ग्राहक तक्रार निवारण मंच यांच्या कार्यालयात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४ लाखापेक्षा अधिक वीज ग्राहकांच्यावतीने पिडित, वंचित, त्रासीत आणि हैराण झालेल्या वीज ग्राहकांच्या समस्या, अडचणीबाबत लेखी सामूहिक तक्रार दाखल करण्याबाबत आयोगाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे अशी माहिती संघटनेचे सचिव दीपक पटेकर यांनी दिली. तर विज समस्येकडे विधानसभेत रिंगणात असणाऱ्या उमेदवारांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. सावंतवाडी येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते म्हणाले, महावितरण कडून होणाऱ्या प्रचंड मानसिक त्रासाला तोंड देण्यासाठी ग्राहक संरक्षण कायदा १९८६ ची यापुढे मदत घेण्याचे जिल्हा वीज ग्राहक संघटना आणि व्यापारी महासंघ यांनी एकजुटीने ठरविले आहे. हल्लीच श्री. तावडे, सावंतवाडी यांना महावितरणकडून होणाऱ्या त्रासाबद्दल आयोगाकडून न्याय मिळाला असून त्याची पुनरावृत्ती भविष्यात सतत होईल अशीच अपेक्षा आमच्या वीज ग्राहक संघटनेची आहे. ज्यांना महावितरणच्या विरोधात केसेस दाखल करायच्या असतील त्यांनी स्वतःचे लाईट बिल, तक्रार अर्ज, आवश्यक फोटो पुरावे, महावितरण कडून आलेले लिखित स्वरूपाचे रिप्लाय यांच्या २/२ झेरॉक्स प्रतिसह ओरोस येथे उपस्थित रहावे. याबाबत जिल्ह्यातील सर्व वीज ग्राहकांना मोफत सल्ला, मार्गदर्शन आणि तांत्रिक सहकार्य केले जाईल असे आवाहन श्रीराम शिरसाट - अध्यक्ष व दीपक पटेकर - सचिव, ॲड. नंदन वेंगुर्लेकर - जिल्हा समन्वयक, सिंधुदुर्ग जिल्हा वीज ग्राहक संघटना यांनी केले आहे. याप्रसंगी जिल्हा सचिव दीपक पटेकर, जिल्हा समन्वयक नंदन वेंगुर्लेकर, जिल्हा उपाध्यक्ष गणेश बोर्डेकर, तालुकाध्यक्ष सावंतवाडी संजय लाड, मेघना राऊळ, अस्लम खतीब, संतोष तावडे, मनोज घाटकर, कृष्णा तेली, संदीप टोपले आदी उपस्थित होते.