४५० रुपयात घरगुती गॅस सिलिंडर महाराष्ट्रात का नाही..?

काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांचा सवाल
Edited by: प्रसाद पाताडे
Published on: November 28, 2023 12:41 PM
views 238  views

कुडाळ : राजस्थानच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने राजस्थानात भाजपची सत्ता आली तर घरगुती गॅस सिलिंडर 450 रुपयात देण्याचे आश्वासन दिले आहे. याला मोदींची गॅरेंटी म्हणून संपूर्ण राजस्थानात सगळीकडे मोठे मोठे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. जर सत्ता आली तर राजस्थानात भाजप 450 रुपयात गॅस सिलिंडर देणार असेल तर महाराष्ट्रात भाजपचीच सत्ता आहे मग महाराष्ट्रातील जनतेला 450 रुपयात सिलिंडर का नाही असा सवाल सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी उपस्थित केला आहे. 

भाजपची केंद्रात 2014 मध्ये सत्ता आल्यापासून 410 रुपयात मिळणारा सिलेंडर आता 1100 रुपयांच्या पार गेला आहे. जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडले आहेत.सामान्य गृहिणींचे गृहखर्चाचे बजेट पूर्ण कोलमडले आहे.अशा परिस्थितीत फक्त निवडणूक जिंकण्यासाठी राजस्थानात गॅस सिलिंडर 450 रुपयात देण्याचे आश्वासन देणे आणि भाजपचेच सरकार असलेल्या महाराष्ट्रात जनतेला घरगुती गॅस सिलिंडर 1100 रुपयांपेक्षा जास्त किंमतीला विकत घ्यावा लागणे हा मोदींचा महाराष्ट्रातील जनतेवर अन्याय आहे.

जर भाजपला राजस्थानात भाजपची सत्ता आली तर घरगुती गॅस सिलिंडर 450 रुपयांना देणे शक्य असेल तर भाजपचे सरकार असलेल्या महाराष्ट्रात का नाही?. असा सवाल इर्शाद शेख यांनी उपस्थित केला आहे.

खरच भाजप राजस्थानात सत्तेत आली तर 450 रुपयात घरगुती गॅस सिलिंडर देणार आहे का? की निवडणूक जिंकण्यासाठीची ही जुमलेबाजी आहे. कारण देशातील जनतेचा भाजपवर विश्वास राहिलेला नाही कारण भाजप निवडणूका जिंकण्यासाठी कोणतीही खोटी आश्वासने जनतेला देते आणि निवडणूका जिंकल्यावर ती आश्वासने पूर्ण तर करत नाहीच त्याबद्दल एक अवाक्षरही काढत नाही जसे मोदींनी 2014 ला भाजपची सत्ता आली तर प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये, वर्षाला 2 कोटी लोकांना रोजगार,शंभर स्मार्ट सीटी अशी बरीच काही आश्वासने दिली होती. स्वीस बँकेतील काळा पैसा आणणार आणि त्यातून नोकरी करणाऱ्या लोकांना काही टक्के इन्कमटॅक्स मध्ये सूट देणार स्वीस बँकेतील काळा पैसा काही आला नाही उलट स्वीस बँकेतील भारतीयांचा पैसा कितीतरी पटीने वाढला आहे मग हा काळा पैसा आहे का?

आणि हा कोणाचा आहे आणि मोदी सरकार सत्तेत आल्यावर यात वाढ कशी झाली? असा सवाल इरशाद शेख यांनी उपस्थित केला असून पेट्रोल डिझेलचे भाव आंतरराष्ट्रीय बाजारात कमी झाल्यावरही त्याचा फायदा मोदींनी कधीही जनतेला मिळू दिला नाही. पेट्रोल व डिझेलचे भाव चढे ठेवून देशातील जनतेला प्रचंड लुटण्याचे काम मोदी सरकारने केले.  त्याबद्दल मोदीच काय भाजपची कोणीही मंडळी त्यावर ब्र काढत नाहीत. अशी टिका सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी केली आहे.