सिंधुदुर्ग जिल्हा कलाकार मानधन समिती अध्यक्षपदी संतोष कानडे

जिल्ह्यातील कलाकार मानधन समिती गठीत
Edited by: उमेश बुचडे
Published on: August 29, 2023 15:22 PM
views 108  views

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुप्रसिद्ध भजनी बुवा तथा भाजपा कणकवली तालुकाध्यक्ष संतोष कानडे यांची सिंधुदुर्ग जिल्हा कलाकार मानधन समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या शिफारशी नुसार जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत चे आदेश समाज कल्याण अधिकाऱ्यांना निर्गमित केले असून याबद्दल संतोष कानडे यांचे जिल्हयाभरातून कौतुक होत आहे.

संतोष कानडे हे सुप्रसिद्ध भजनीबुवा असून भजन कलेची आवड त्यांनी गेली 30 वर्षहून अधिक काळ जोपासली आहे. भजनाच्या माध्यमातून अध्यात्माचा प्रसार आणि प्रचार ते करत आहेत. या निवडीनंतर प्रतिक्रिया देताना कानडे म्हणाले की जिल्ह्याभरात पारंपारिक लोककलाकाराना न्याय मिळवून देण्याचे काम कलाकार मानधन समिती अध्यक्ष म्हणून मी करणार आहे. ज्या कलाकारांचे उदरनिर्वाहाचे साधन ही त्यांची कला आहे अशा गरजू कलाकाराना प्राधान्याने शासकीय मानधन मिळवून देणार आहे. 

शासनाकडून पारंपारिक लोककलाकाराना दरमहा रुपये 2,250 एवढे मानधन मिळते. यासाठी सविस्तर प्रस्ताव हा जिल्हा कलाकार मानधन समितीकडे सादर करावा लागतो. जिल्हा कलाकार मानधन समितीने मंजूर केलेल्या प्रस्तावानंतर समाज कल्याण खात्याकडून कलाकाराला दरमहा 2250 रूपये मानधन मिळते. जिल्ह्यात सध्या 500 हुन अधिक प्रस्ताव प्रलंबित असून सर्व गरजू कलाकारांना शासकीय मानधन मिळवून देणार असल्याचे नूतन अध्यक्ष संतोष कानडे म्हणाले.