आडाळी MIDC विकास कृती समितीला सिंधुदुर्ग बागायतदार संघाचा पाठिंबा

Edited by:
Published on: September 27, 2025 14:34 PM
views 246  views

दोडामार्ग : आडाळी गावासह दोडामार्ग तालुक्यातील बेरोजगार यांना रोजगार मिळावा, तालुक्याचा आर्थिक विकास व्हावा, या उद्देशाने पंधराएक वर्षांपूर्वी ग्रामस्थांनी आपल्या हृदयावर दगड ठेवत अतिशय अल्प दराने एमआयडीसीला जमीनी त्यांच्या पदरी अस निराशाच आली आहे त्यामुळे अडाळी कृती समितीने जो निर्णय घेतला त्याला आपला पूर्ण पाठिंबा आहे. अशी भूमिका सिंधुदुर्ग बागायतदार संघाने घेतली आहे.

 सिंधुदुर्ग बागायतदार संघाचे अध्यक्ष विलास सावंत यांनी या प्रश्नावर आपली भूमिका जाहीर केली आहे. ते म्हणाले, त्यावेळी बाजारभाव चौपटीने म्हणजेच प्रति एकर १६–१७ लाख रुपये असताना, ग्रामस्थांनी केवळ साडेपाच लाख रुपयांच्या आसपास दराने MIDC ला जमीन हस्तांतरित केली. उद्दिष्ट एकच – स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करणे.

मात्र, गेल्या १५ वर्षांत शासनाच्या उदासीन भूमिकेमुळे अपेक्षित औद्योगिक विकास झाला नाही. कृती समितीच्या माहितीनुसार केवळ ५२ उद्योजकांनी भूखंड घेतले असून आवश्यक सुविधा उपलब्ध न झाल्याने त्यांनाही उद्योग सुरू करता आलेले नाहीत. याउलट शासनाने अलीकडेच ऑनलाईन भूखंड वाटप प्रक्रिया बंद करून ऑनलाईन विंडोही बंद केली आहे.

कृती समितीचा आरोप आहे की, जर या ठिकाणी धनदांडग्यांचे गोल्फ सिटी, रिअल इस्टेट किंवा पर्यटनसारखे प्रकल्प उभे राहिले, तर भूमिपुत्र आणि नवउद्योजकांवर अन्याय होईल. त्यामुळे आडाळी एमआयडीसी विकास कृती समिती जी लढा देत आहे, त्या लढ्याला सिंधुदुर्ग फळबागायतदार व शेतकरी संघाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे श्री. विलास सावंत यांनी स्पष्ट केले.

शासनाने आपली उदासीनता सोडून त्याग केलेल्या ग्रामस्थांच्या सर्वांगीण विकासासाठी समिती व ग्रामस्थांशी चर्चा करून ठोस पावले उचलावीत, अशी मागणीही संघटनेतर्फे करण्यात आली.

आडाळी एमआयडीसी कृती समितीचे अध्यक्ष  पराग गावकर आणि सचिव  प्रवीण गावकर हे जिकिरीने लढा देत असून, या संघर्षात बागायतदार संघही सक्रिय सहभाग घेईल, असा विश्वास विलास सावंत यांनी व्यक्त करत आपला पाठिंबा जाहीर केला आहे.