
सिंधुदुर्गनगरी : अनुसूचित जमातीच्या यादीत नोंद क्रमांक ३६ मध्ये असलेले धनगड हे नाव चुकीचे असून प्रत्यक्षात ती जमात धनगर अशी आहे. त्यामुळे शासनाने तातडीने दुरुस्ती करून धनगड या नावाच्या जागी धनगर असा शासन आदेश काढावा अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा धनगर समाजाच्या वतीने करण्यात आली आहे तसेच निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे याच मागणीसाठी जालना येथे सुरू असलेल्या दीपक बोऱ्हाडे यांच्या उपोषणालाही जिल्ह्यातील समाजाने जाहीर पाठिंबा दिला आहे.
याबाबत शासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्यात धनगड नावाची कोणतीही जमात अस्तित्वात नाही. अस्तित्वात असलेली जमात फक्त धनगर आहे. १७ सप्टेंबर २०१५ रोजी उच्च न्यायालयात दिलेल्या निकालातही हे स्पष्ट झाले असून, संविधानात नसलेल्या जमातीला अनुसूचित यादीत स्थान देता येत नाही, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानेही दिला आहे.महाराष्ट्र शासनाने यापूर्वी अनेक वेळा चुकीच्या शब्दांतील दुरुस्ती आदेश काढले आहेत. त्याच धर्तीवर या प्रकरणी तातडीने शासन निर्णय काढावा, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा धनगर समाजाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
दरम्यान, शासनाने योग्य ती दखल न घेतल्यास धनगर समाजाला तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. यावेळी सुरेश झोरे, अमोल जंगले, बापू खरात, मंदार वरक, कानू शेळके, अंकुश जंगले, परशुराम लांबर, राजा बुटे आदी उपस्थित होते.










