
आम. निलेश राणे यांनी केली होती मागणी
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी सिंधुदुर्ग नगरी आणि कुडाळ येथे मागासवर्गीय मुला-मुलींसाठी दोन नवीन सरकारी वसतिगृहे मंजूर केली आहेत. या वसतिगृहांमुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होणार आहेत.
आमदार निलेश राणे यांनी १३ ऑगस्ट २०२५ रोजी यासंदर्भात मागणी केली होती. त्यांच्या पत्राला उत्तर देताना, सामाजिक न्याय मंत्रालयाने या मागणीला तात्काळ मंजुरी दिली आहे.
या पत्रात असे नमूद करण्यात आले आहे की, ग्रामीण भागातील अनेक मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते, मात्र निवास आणि भोजनाच्या सोयीअभावी त्यांना अनेक अडचणी येतात. नवीन वसतिगृहांमुळे या विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण, पौष्टिक भोजन आणि अभ्यासासाठी अनुकूल जागा मिळेल. यामुळे त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला तसेच सामाजिक आणि आर्थिक उन्नतीसाठी मोठी मदत होईल.
मंत्री संजय शिरसाट यांनी या निर्णयामुळे सामाजिक समावेश आणि शैक्षणिक संधींचा विस्तार होण्यास मदत होईल असे सांगितले. या वसतिगृहांच्या पुढील कार्यवाहीसाठी प्रशासकीय प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे.










