
सिंधुदुर्गनगरी : केंद्र शासनाद्वारे राबविण्यात येणा-या नमस्ते योजनेंतर्गत आज जिल्हाधिकारी श्री. अनिल पाटील यांच्या हस्ते जिल्हयातील नगरपालिकांमधील सिवर व सेप्टिक टॅंक कामगारांना संरक्षणात्मक उपकरणांचे वितरण करण्यात आले. केंद्र शासनाच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय व सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाद्वारे नमस्ते म्हणजेच नॅशनल ऍक्शन फॉर मेकॅनाईज्ड सॅनिटेशन इकोसिस्टिम ही योजना सिवर व सेप्टिक टॅंक कामगारांची सुरक्षा सुनिश्चित करण्याच्या हेतूने २०२३ ते २०२६ या तीनवर्षांच्या कालावधीसाठी राबविण्यात येत आहे. सदर योजनेद्वारे सिवर व सेप्टिक टॅंकच्या स्वच्छतेसाठी १०० टक्के यांत्रिकीकरण करण्यास प्रोत्साहन दिले जाणार असुन देशातील सर्व शहरांमध्ये ही योजना राबविली जात आहे. या योजनेचा लाभ नगरपालिका तसेच इतर शासकीय विभाग व खाजगी क्षेत्रात काम करणा-या सिवर व सेप्टिक टॅंक कामगारांना घेता येईल. या योजनेंतर्गत संबंधित लाभार्थ्यांना आरोग्य विमा, प्रशिक्षण सुविधांसह स्वच्छतेशी निगडीत वाहने व यंत्रे खरेदी करण्यासाठी स्वच्छता उद्यमी योजनेंतर्गत वित्तपुरवठा, वैयक्तिक सुरक्षा उपकरणांचे वितरण इत्यादी लाभ शासनामार्फत दिले जाणार आहेत.
या योजनेद्वारे सिंधुदुर्ग जिल्हयातील नगर पालिका क्षेत्रात कार्यरत असलेल्या एकूण ३४ कामगारांना राष्ट्रीय सफाई कर्मचारी वित्तीय विकास महामंडळाकडून सेफ्टी हेल्मेट, गमबूट, गॉगल, गॅस गार्ड, हॅन्ड ग्लोव्हस, फ्लुरोसेंट जॅकेट, मास्क हि सुरक्षा उपकरणे प्राप्त झालेली असून या उपकरणांचे वितरण प्रातिनिधिक स्वरुपात मा. जिल्हाधिकारी श्री अनिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा सहआयुक्त, नगर विकास विभाग, श्री विनायक औंधकर, कुडाळ नगरपंचायत, मुख्याधिकारी श्री अरविंद नातू व जिल्हा तांत्रिक तज्ञ, नगर विकास विभाग श्री निखील नाईक उपस्थित होते.
यावेळी उपस्थित लाभार्थी श्री राजन कदम व सुभाष जाधव यांनी नमस्ते योजनेंतर्गत प्राप्त झालेल्या सुरक्षा उपकरणांचा प्रत्यक्ष काम करताना आम्हाला फायदा होईल व यामुळे आमच्या आरोग्यासही लाभ होऊ शकेल असे सांगून जिल्हाधिकारी श्री अनिल पाटील यांचे आभार व्यक्त केले.