
सिंधुदुर्ग : आज सिंधदुर्ग जिल्ह्याला ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ (एआय) युक्त जिल्हा म्हणून राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीकडून अधिकृत मान्यता मिळाली आहे. याअनुषंगाने 'एआय' वापरासाठी मार्व्हल कंपनी व सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासन यांच्यात आज महत्त्वपूर्ण करारनामा झाला. यानुसार सिंधुदुर्ग जिल्हा हा आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करणारा राज्यातील पहिला जिल्हा ठरला असून जिल्ह्याने एक नवा इतिहास रचला आहे. या प्रणालीच्या माध्यमातून जिल्ह्यातील नागरीकांना कमीत कमी कालावधीत अधिक दर्जेदार सोयी सुविधा उपलब्ध होणार आहेत.
सिंधुदुर्ग पाठोपाठ गडचिरोली जिल्हा देखील एआय युक्त करण्याचा माननीय मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस यांचा मानस आहे. त्यामुळे येत्या काळात सिंधुदुर्ग जिल्हा हा तंत्रज्ञानाच्या बाबतीत राज्यात आणि देशात आदर्श जिल्हा बनेल असा विश्वास आहे. हि सिंधुदुर्गकरांसाठी निश्चितच अभिमानाची आणि गौरवाची बाब असून 'एआय' वापरासाठी अधिकृत परवानगी दिल्याबद्दल राज्य शासनाचे तसेच माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचे आभार मानले.
यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहिकर, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, मार्व्हल कंपनीचे हर्ष पोतदार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सई धुरी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, शिक्षणाधिकारी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.