
सावंतवाडी : शेती वाचवा, शेतकरी जगवा असा नारा देत महाराष्ट्र लोकाधिकार समितीकडून स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येत आहे. सावंतवाडी येथे बस स्थानकासमोर त्यांनी ही मोहीम राबवली असून जंगली प्राण्यांचा उच्छाद संपवण्यासाठी पुढाकार घ्या, वन्य प्राण्यांमुळे शेतातील पिकांचे होणारे अतोनात नुकसान थांबवा अशी मागणी संस्थापक अध्यक्ष ॲड. प्रसाद करंदीकर यांनी केली आहे. लोकप्रतिनिधी, शासनाला या गोष्टीची जाणीव आहे. त्यांनी यात लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय द्यावा असं आवाहन त्यांनी केले आहे.
श्री. करंदीकर म्हणाले, आपल्या देशात शेती हा मुख्य व्यवसाय असून बहुसंख्य जनतेचे उत्पन्न त्यावर अवलंबून आहे. परंतु, गेल्या काही वर्षात वन्य प्राण्यांचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गवे-रेडे, हत्ती, माकडे, रानडुक्कर इत्यादी वन्य प्राण्यांमुळे शेतातील पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. शेतकरी दिवस रात्र मेहनत करून पिके लावतात, खत-पाणी घालतात कसून निगा राखतात. मात्र, या वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमुळे अनेकदा संपूर्ण पिके उध्वस्त होताना दिसून येत आहेत. त्यामुळे शेती आणि बागायती व्यवसाय पूर्णतः धोक्यात आला आहे. गवे-रेडे, हत्ती हाता-तोंडाशी आलेली पिके तुडवून नासधूस करतात. माकडांची टोळकी माळझाडांवरील फळे, परत गाडी लावलेल्या भाज्या नष्ट करतात. हत्ती, गवे रेडे यांच्या हल्ल्यात तर शेतकऱ्यांची बरेदारेही सुरक्षित राहू शकत नाहीत. जुत्ररसारख्या ठिकाणी तर बिबटे नरभक्षक झाल्याने नवे संकट उभे राहिले आहे. शेतकरी, त्यांच्या घरातील महिला आणि विशेषतः लहान मुले यांच्या जीविताचीच तेथे सुरक्षितता उरली नसून इतर ठिकाणीही तसे प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या आक्रमक झालेल्या बिबट्यांपासून जीव वाचवण्यासाठी शेतात राखण करणाऱ्या कुत्र्यापासून माणसांपर्यंत गळ्यात लोखंडी खिळे असलेले पट्टे घालून वावरण्याची पाळी शेतकऱ्यांवर आली आहे. या वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे शेतकऱ्याची तहानभूक आणि झोपही हरपून गेली आहे. त्यातून त्याचे आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्य ही धोक्यात आले आहे असं ते म्हणाले.
तसेच वन्यजीवांचे संरक्षण महत्त्वाचे असले तरी शेतकऱ्याला वाचवणे आणि त्याला जगवणेही तितकेच महत्त्वाचे आहे. वन्यजीव संरक्षण कायद्यातील किचकट तरतुदीमुळे शेतकऱ्यांना काहीच उपाय करता येत नाहीत. त्यांच्या हालअपेष्टा वाढल्या आहेत. शेतकरी वाचला तरच देश वाचेल म्हणून जंगली जनावरांच्या त्रासावर तातडीने ठोस उपाययोजना होणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी सरकारने तातडीने नुकसान भरपाईची प्रक्रिया सुलभा करावी. सोलर फेंसिंग जाळी व इतर संरक्षणात्मक साधनांसाठी तरतूद करावी अथवा त्यासाठी अनुदान द्यावे, तसेच वनखात्याच्या पथकांना तातडीने घटनास्थळी पाठवण्याची यंत्रणा उभी करावी. स्थानिक ग्रामपंचायती, वनविभाग आणि नागरिकांची समिती नेमुन शेतकरी आणि वन्यप्राणी यांच्यातील संतुलन राखण्यासाठी उपाययोजना करावी. त्यातून मजबुत सौर/विद्युत कुंपण व्यवस्था, वन्य प्राण्यांच्या हालचालीचे वैज्ञानिक मॅपिंग, जलस्त्रोत व अन्नाचे क्षेत्र नियोजन आदी उपाय तातडीने व प्रभावीपणे राबवले जाणे आजची गरज आहे. आपल्या शेतकऱ्यांच्या वेदनेला आवाज देत शाश्वत उपायांच्या दिशेने वाटचाल व्हावी यासाठी आम्ही शेतकऱ्यांसोबत पूर्ण ताकदीने उभे राहणार आहोत. शेतकऱ्यांना जगवण्या जे जे काही करावे लागेल ते करणार आहोत. सर्वांच्या साथीने या संकटावर मात करू, अन्नदात्या शेतकऱ्याला आणि त्याच्या कुटुंबाला वाचवण्यासाठी पुढे या असं आवाहन केलं. यावेळी जिल्हाध्यक्ष दीपक कुडाळकर, विवेक नाईक, संजय पवार, प्रसाद नाईक आदी उपस्थित होते.










