
सावंतवाडी : अल्प कालावधी कोकणात अग्रेसर ठरलेल्या प्रभा प्रकाशन कणकवलीतर्फे दरवर्षी एका उत्कृष्ट साहित्यकृतीला प्रभावती कांडर स्मृती 'आवानओल' पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. यावर्षीच्या सदर पुरस्कारासाठी लोकवाङ्मय गृह मुंबईतर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या सावंतवाडी येथील कादंबरीकार श्वेतल परब यांच्या 'कोल्हाळ' कादंबरीची निवड करण्यात आली आहे.
3 हजार रुपये, स्मृतीचिन्ह, शाल आणि ग्रंथ अशा स्वरूपाचा हा पुरस्कार नोव्हेंबर मध्ये वैभववाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या पुरस्कार सोहळ्यात श्वेतल परब यांना देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रभा प्रकाशन ही कोकणातील लोकप्रिय प्रकाशन संस्था असून मागील चार वर्षाच्या कालावधीमध्ये 40 ग्रंथ प्रभा प्रकाशनातर्फे प्रकाशित करण्यात आले आहेत. यात कोकणातील स्थानिक लेखकांची लेखन गुणवत्ता अभिजात साहित्य वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी स्थानिक लेखकांचे ग्रंथ अग्रक्रमाने प्रकाशित केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रभा प्रकाशनाने महाराष्ट्रातील इतर प्रकाशन संस्थांनी प्रकाशित केलेल्या उत्तम ग्रंथांना प्रभा प्रकाशनातर्फे पुरस्कार देऊन गौरविण्यात येत आहे. या पुरस्कारासाठी ग्रंथांची निवड करताना कोकणातील साहित्यिकांच्या ग्रंथांना प्राधान्यही देण्यात येत आहे. या कादंबरी बद्दल नामवंत समीक्षक डॉ.दत्ता घोलप म्हणतात,'कोल्हाळ' ही कादंबरी यांची शैक्षणिक अवकाश कवेत घेत या क्षेत्रात जे विनाअनुदानित धोरण राबविले त्याचे प्रत्यक्ष परिणाम काय आहेत.
अध्ययन आणि अध्यापनाचे नेमके काय झाले याचा वास्तवदर्शी तपशीलवार लेखाजोखा मांडला आहे. अनुभवपट हा स्त्रीच्या नजरेतून येतो त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती आणि कुटुंब यांची होणारी परवड या बाबी तर तळपातळीवरून तपासल्या आहेतच शिवाय व्यवस्थेच्या पातळीवर काय घडते कसे घडवले जाते याचा शोध घेतला आहे.कादंबरीगत जीवनचरित्र व्यक्ती, कुटुंब, शाळा, संस्था, संघटना , संघर्ष आणि हतबलता, शासन असे विस्तारत जात शेवटी मानवी जगण्याची मूल्यात्मक चौकट काय असू शकते यावर भाष्य करते.










