
देवगड : जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेने रक्षाबंधनाचे औचित्य साधून प्रशालेसमोर “वृक्षरक्षाबंधन“ हा अभिनव उपक्रम राबवला. जशी बहीण भावाला राखी बांधून त्याच्या कडून रक्षणाची हमी घेते , तशीच झाडांना राखी बांधून त्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी गोगटे प्रशालेच्या मुलींनी घेतली.
वृक्षतोड थांबवणे, हिरवाई वाढवणे, लोकांमध्ये झाडांचे महत्त्व पटवून देणे, झाडांना सजीव मानून त्यांच्याशी आपुलकीचे नाते जपणे, रक्षाबंधन सणाचा वापर करून पर्यावरणाचा संदेश पसरवणे या उद्देशाने गोगटे प्रशालेने राबविलेला “वृक्षरक्षाबंधन “ हा अभिनव उपक्रम कौतुकास पात्र ठरत आहे.
प्रशालेतील मुलींनी वडाला राखी बांधून वडाभोवती फेरी मारून त्याचे महत्व सांगितले. व या झाडाचे मी रक्षण करेन अशी शपथ घेतली.
याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक सुनील जाधव, कार्यक्रम प्रमुख.मानसी मुणगेकर, विज्ञान शिक्षक सतीशकुमार कर्ले, विनायक जाधव, संजीवनी जाधव उपस्थित होते.
वृक्षरक्षाबंधनाच्या माध्यमातून निर्माण करण्यात आलेल्या जनजागृतीतून झाडांची संख्या टिकून राहते. पर्यावरणात ऑक्सिजनचे प्रमाण व हवेची शुद्धता वाढते.पाणीधारक क्षमता वाढून पाणी टंचाई कमी होण्यास मदत होते.व स्थानिक जैवविविधतेचे रक्षण होते. मुलांकडून राख्या तयार करून घेणे ते वृक्षरक्षाबंधन कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन मानसी मुणगेकर यांनी केले.