श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेमध्ये स्वामी विवेकानंद - राजमाता जिजाऊंना अभिवादन

Edited by: नागेश दुखंडे
Published on: January 13, 2026 13:26 PM
views 35  views

देवगड : देवगड तालुक्यातील जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेमध्ये स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांचा संयुक्त जयंती समारंभ साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक सुनील जाधव, ज्येष्ठ शिक्षक संजय पांचाळ, राधिका वालकर, दीपा टकले, मानसी मुणगेकर, मोहन सनगाळे, सुनील भाकरे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मुख्याध्यापक सुनील जाधव यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने झाली. स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून बोलताना मुख्याध्यापक सुनील जाधव म्हणाले की, स्वामी विवेकानंदांचे विचार युवकांना आत्मविश्वास, राष्ट्रभक्ती व चारित्र्यनिर्मितीची दिशा देणारे आहेत. “उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका” हा त्यांचा संदेश आजच्या तरुणाईसाठी मार्गदर्शक आहे.

तसेच राजमाता जिजाऊ या केवळ शिवरायांच्या माता नसून आदर्श राष्ट्रघडवणाऱ्या मातृत्वाचे प्रतीक आहेत. त्यांच्या संस्कारांमुळे छत्रपती शिवाजी महाराजांसारखा महान नेता घडला. जिजाऊंचे धैर्य, शौर्य व राष्ट्रनिष्ठा प्रत्येक पालक व नागरिकासाठी प्रेरणादायी आहे.

या दोन्ही महान व्यक्तिमत्त्वांच्या विचारांचा संगम आजच्या पिढीने आत्मसात करून शिक्षण, सेवा व समर्पणाच्या माध्यमातून राष्ट्रउभारणीत योगदान द्यावे, असे आवाहन.सुनील जाधव यांनी केले. इयत्ता नववी अ मधील विद्यार्थिनी नीरजा घाडीगावकर हिने स्वामी विवेकानंद व कुमारी- सृष्टी थोटम हिने राजमाता जिजाऊ यांच्या जीवनावर भाषण केले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक संजीवनी जाधव यांनी केले तर आभार लावण्या जाधव हिने केले.