श्री तारादेवी फुगडी ग्रुप केळूसचा जिल्ह्यात डंका

Edited by: दिपेश परब
Published on: October 09, 2025 10:45 AM
views 337  views

वेंगुर्ला : पारंपरिक फुगडीला आधुनिकतेची जोड देत आपल्या दर्जेदार सादरीकरणाने जिल्ह्यात नावाजलेला फुगडी ग्रुप म्हणजे श्री तारादेवी फुगडी ग्रुप केळुस. जिल्ह्यात विविध स्पर्धांमध्ये प्रथम क्रमांक तसेच विविध कार्यक्रमांमध्ये उत्तम सादरीकरण करत सध्या जिल्ह्यात अव्वल हा फुगडी ग्रुप ठरत आहे. यामुळे विविध स्थरावरून त्यांचे कौतुक होत आहे. 

नोव्हेंबर २०१५ ला स्थापन या फुगडी ग्रुप ची स्थापना झाली. केळुस सारख्या ग्रामीण भागातील महिलांनी एकत्र येत हा ग्रुप स्थापन केला. आपला संसार सांभाळून आपल्या अंगातील कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने व पारंपरिक फुगडीला व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने या फुगडी ग्रुप ची स्थापना करण्यात आली. या ग्रुपला सुरुवातीच्या काळात अनेक अडीअडचणींना सामोरे जावे लागले. पण ग्रामदेवता तारादेवीच्या नावाने ओळखला जाणारा हा फुगडी संघ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक गावामध्ये गणेश चतुर्थी, नवरात्रोत्सव, जत्रोत्सव तसेच विविध धार्मिक सणांच्या निमित्ताने आपली कला सतत सादर करत राहिला. जसजसी वर्ष पुढे गेली तसतसे आपल्या संघात बदल करत त्याला आधुनिकतेची जोड देत सध्या हा संघ निमंत्रित फुगडी, जुगलबंदी, फुगडी स्पर्धा यांच्या माध्यमातून आपली कला सादर करीत आहे. पारंपरिक फुगडीला आधुनिकतेची जोड देत आपल्या दर्जेदार सादरीकरणाने हा श्री तारादेवी फुगडी ग्रुप अव्वल स्थानावर आहे. 

नुकत्याच झालेल्या इनामदार श्री रामेश्वर संस्थान कसबा आचरे, तालुका मालवण गणेशोत्सव २०२५ च्या निमित्ताने श्री देव रामेश्वर मंदिरात देवूळवाडा मित्र मंडळाच्या वतीने जिल्हा स्तरीय मंगळागौर फुगडी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक नामवंत फुगडी संघ सहभागी झाले होते. या स्पर्धेत उत्कृष्ट गायन, सांघिक मेहनतीमुळे बहारदार सादरीकरण आणि सुंदर साथ देणाऱ्या ढोलकीच्या मदतीने वेंगुर्ले तालुक्यातील केळूसच्या या श्री. तारादेवी फुगडी संघाने बाजी मारत रोख रुपये १०,०००/- आणि आकर्षक चषकावर आपले नाव कोरुन प्रथम क्रमांक पटकावला. अलिकडेच नवरात्रौत्सवाच्या निमित्ताने वेंगुर्ले तालुक्यातील मातोंड गावी झालेल्या फुगडी स्पर्धेत सुद्धा श्री. तारादेवी फुगडी संघ प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला होता तर दोडामार्ग तालुक्यातील कुब्रंल गावी झालेल्या फुगडी स्पर्धेत श्री. तारादेवी फुगडी संघाला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. या त्यांच्या यशामुळे या फुगडी ग्रुप सहित केळुस गावचे नावही जिल्हाभर होत आहे.