
कुडाळ : आपला जिल्हा 'स्वच्छ जिल्हा' आणि 'पर्यटन जिल्हा' म्हणून देशात नावाजलेला आहे. या लौकिकाला साजेसा आणि जिल्हा प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देणारा एक आदर्श उपक्रम ओरोस ग्रामपंचायतीने राबविला आहे. काल संपन्न झालेल्या श्री रवळनाथ मंदिर जत्रोत्सवानंतर, आज ग्रामपंचायतीच्या वतीने मंदिर परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ आणि सुंदर करण्यात आला.
जिल्ह्यात असंख्य पर्यटक आणि भाविक देवस्थानांना भेटी देत असतात. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील मंदिर परिसर आणि धार्मिक स्थळांवर भाविकांची आणि ग्रामस्थांची सतत वर्दळ असते. यामुळे परिसरात प्लास्टिक, कागद, कोरडे गवत, आणि निर्माल्य (पान-फुलांचे अवशेष) यांचा साठा वाढतो. केवळ धार्मिक पावित्र्यच नव्हे, तर पर्यावरणीय स्वच्छता, सार्वजनिक आरोग्य आणि पर्यटन विकासाच्या दृष्टीने मंदिर परिसर स्वच्छ राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
याच पार्श्वभूमीवर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आणि जिल्हा प्रशासनाने मंदिर परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत, ओरोस बुद्रुक येथे काल (दि. ८) श्री रवळनाथ मंदिराचा जत्रोत्सव मोठ्या उत्साहात पार पडल्यानंतर, आज लगेचच स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली.
या मोहिमेचे नेतृत्व सरपंच सौ. आशा मुरमुरे आणि ग्रामपंचायत अधिकारी श्री. अनिल चव्हाण यांनी केले. यावेळी मंदिर परिसरातील प्लास्टिक, कागद आणि इतर कचरा गोळा करून योग्य विल्हेवाट लावण्यात आली. या उपक्रमात सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि कर्मचारी वृंदाने उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
"मंदिर परिसर स्वच्छ आणि पवित्र ठेवणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून ती आपली नैतिक जबाबदारी आहे. यामुळे गावाचे सौंदर्य तर वाढतेच, पण पर्यटनालाही चालना मिळते," अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. ओरोस ग्रामपंचायतीच्या या तत्परतेचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.










