
दोडामार्ग : मणेरी येथील श्री देवी सातेरी पंचायतन देवताचा वार्षिक जत्रोत्सव रविवारी असंख्या भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. गोवा कर्नाटक, महाराष्ट्र आदी भागातील भाविकांचा जनसागर उसळला होता. दुपारपासूनच देवींची ओटी भरण्यास माहेरवासिणिनी गर्दी केली होती. जत्रोत्सवानिमित्त श्री सातेरी देवीचे मंदिर विद्युत रोषणाईने सजविलेले होते. रविवारी सकाळी देवीला साडी नेसवणे व अभिषेक करून देवींची विधिवत पूजा, आरती, विविध कार्यक्रम पार पडले. तर सायंकाळी देवींची ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरु होता. नवसाला पावणारी हाकेला धावणारी मणेरी गावच्या सातेरी देवीकडे अनेक भाविकांनी साकडे करून नवस केले. तर गतवर्षी केलेले नवस ही फेडण्यात आले. रात्री पावणीचा कार्यक्रम, देवीची आरती, पालखी मिरवणूक काढण्यात आली. तर रात्रौ मामा मोचेमाडकर यांचा नाट्य प्रयोग ही सादर करण्यात आला.












