
वेंगुर्ला : आपण जीवन किती वर्षे जगलो हे महत्त्वाचं नसून आपण आयुष्य कसं जगलो हे महत्त्वाचं असत. विठ्ठल पंचायतन देवस्थान वायंगणी हे आदर्श धार्मिक संकुल उभं राहतं आहे. येथे काम करणाऱ्यांचा, दान देणाऱ्यांचा गौरव होणं हे दादा महाराज्यांच्या कल्पनेतून झालं आहे. याठिकाणी सामाजिक उपक्रम सुद्धा घेतले जातात ही चांगली गोष्ट आहे. मंदिर ही केवळ धार्मिक कामाकरिता सिमीत न राहता ते सामाजिक गोष्टींकरिता सुद्धा उपलब्ध पाहिजे. मला याठिकाणी बोलवलं हे मी माझं भाग्य समजतो. हे केंद्र अध्यात्मिकते बरोबर एक आदर्श समाज केंद्र व्हावं. प.पु. दादा पंडित महाराज्यांकडून या क्षेत्राचा विकास उत्कृष्टपणे होईल यात दुमत नाही असे प्रतिपादन गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी वायंगणी येथे केले.
श्री विठ्ठल पंचायतन देवस्थान खानोली सुरंगपाणी येथे ८ डिसेंबर दत्तनवकारंभ ते १४ डिसेंबर दत्तजन्मोत्सव, गुरुचरित्रपठण व धार्मिक धार्मिक कार्यक्रम, भजन, नामस्मरण, दशावतारी नाट्यप्रयोग उत्साहात संपन्न झाले. तसेच १५ डिसेंबर रोजी श्री दत्तमहाराज पाद्यपूजा, सौ व श्री शंकर पार्सेकर यांच्याहस्ते सत्य दत्तपूजा यानंतर आरती, तीर्थप्रसाद, पालखी प्रदक्षिणा, महाप्रसाद आदी कार्यक्रम संपन्न झाले. यावेळी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या श्री विठ्ठल पंचायतनातील मंदिरांचे नूतनीकरण, मंदिरास दिलेली जमीन, देणगीदारांचा सत्कार कार्यक्रमात गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर श्री विठ्ठल पंचायतनचे प.पु. दादा पंडित महाराज, वायंगणी सरपंच अवि दुतोंडकर, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कोकण विभागाच्या अध्यक्ष अर्चना घारे- परब, कोकणसाद लाईव्हच्या संपादिका देवयानी वरस्कर आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात या देवस्थानला जमीन देणाऱ्या जमीन मालक शंकर मसूरकर, या देवस्थानकडे जाणाऱ्या रस्त्यावर स्ट्रीट लाईटची व्यवस्था केल्याबद्दल ग्रामपंचायत वायंगणी सरपंच अवि दुतोंडकर, दानशूर व्यक्ती राजाराम गावडे (तळवडे), विश्वजित मीठबावकर (मुंबई), उल्हास भोगटे (कुडाळ), दिलीप मालवणकर (वेंगुर्ला), दिगंबर नाईक (वेंगुर्ला), वायंगणी उपसरपंच रवींद्र धोंड, ग्रा प सदस्य राखी धोंड, विद्या गोवेकर, अनंत मठकर, मंदिर कामकाजाच्या नूतनीकारणासाठी हातभार लावणारे शिवलाल सैनी, मंदिर परिसर स्वछता करणारे विनायक गावडे, या देवस्थानात गेली ४ वर्षे अविरत कार्यरत असलेले राघोबा हंजणकर, दादा हळदणकर, श्रीकांत चेंदवणकर व गेली २५ वर्षे या देवस्थानचे इतर कामकाज पाहणाऱ्या मनीष कुबल यांचा सत्कार या करण्यात आला.
यावेळी पुढे बोलताना गोवा माजी मुख्यमंत्री श्री पार्सेकर म्हणाले की, वायंगणी हे निसर्गरम्य गाव आहे. या गावात जनसामान्यांच्या मदतीने आणि परम पूज्य दादा पंडित महाराज्यांच्या दृष्टीकोनातुन गेल्या २० ते २५ वर्षात हे धार्मिक संकुल बनले आहे. हे साऱ्या जनतेचे श्रद्धास्थान बनतय. हे सर्व उभं करण्यात अनेकांचे योगदान आहे. तसेच यावेळी बोलताना अर्चना घारे परब म्हणाल्या की, प पु. दादा पंडित महाराज्यांचे घोषवाक्य आहे, "दिवसाची सुरुवात प्रेमाने करा" आणि हे त्यांनी दाखवून दिलं आहे की, ईश्वरावर प्रेम कस करावं. दादा महाराज्यांनी अतिशय चांगले कार्य या भागात केले आहे. कोकणचा आध्यत्मिक वारसा ते पुढे चालवत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील काळात निश्चितच आम्ही या देवस्थान साठी निश्चितच हातभार लावू असे त्या म्हणाल्या.
तसेच ज्यावेळी आपण एखाद्याचे ऋण व्यक्त करतो त्यावेळी आपण आपल्या मनाची श्रीमंती दाखवून देत असतो. आज दत्तजयंती निमित्त गेले ८ दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाचा समारोप आज विविध व्यक्ती, दात्यांच्या सत्काराने करण्यात आला. अगदी याठिकाणी दररोज स्वछता करणाऱ्या व्यक्तीचा सुद्धा सत्कार झाला. यातूनच दादा महाराज्यांचे विचार किती उच्च आहेत हे दिसून येतात असे यावेळी कोकणसाद लाईव्हच्या संपादिका देवयानी वरस्कर यांनी सांगितले. तर गेली अनेक वर्षे या स्थळात विविध धार्मिक कार्यक्रम, नामस्मरण, भजन व दशावतारी नाट्यप्रयोग दादा महाराज्यांच्या माध्यमातून होत असतात. आणि हे कार्यक्रम करत असताना त्यांचे अचूक नियोजन असते. माझा याठिकाणी केलेला सत्कार माझ्यासाठी अतिशय मोलाचा असल्याचे यावेळी सरपंच अवि दुतोंडकर यांनी सांगितले.