
खेड : गुहागर विधानसभा मतदार संघातील सवणस सडेवाडी-अणसपुरे तळघर रस्त्यावर शिंदे गटाच्या शिवसैनिकांकडून उद्या रविवार, दि. २४ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता श्रमदान करून रस्ता तयार करण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. तालुक्यातील शिवसैनिक, खाडीपट्टा जिल्हा परिषदेच्या गटातील कार्यकर्ते तसेच स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने या श्रमदानात सहभागी होणार आहेत.
या उपक्रमाला शिवसेना उपनेते व माजी आमदार संजय कदम, उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुख मा. शशिकांत चव्हाण, जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती अरुण कदम, खेड तालुकाप्रमुख मा. अरविंद चव्हाण, तसेच तालुक्यातील कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
गुहागर विधानसभा मतदार संघातील ठाकरे गटाचे विद्यमान आमदार भास्कर जाधव यांनी विकासकामांबाबत केलेल्या दाव्यांना प्रत्यक्ष श्रमदानातून उत्तर देत शिंदे गट राजकीय चपराक देत असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये रंगली आहे. रस्ता तयार करण्याचे काम हाती घेऊन ग्रामस्थांना प्रत्यक्ष मदत केल्याने या उपक्रमाची दखल राजकीय पातळीवर घेतली जात आहे.