
सावंतवाडी : माजी मुख्यमंत्री, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जनसंवाद यात्रा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या सावंतवाडीत पार पडली. गांधी चौक येथील या सभेस मोठ्या संख्येने उबाठा शिवसेनेचे सैनिक यावेळी उपस्थित राहिले होते. यावेळी संवाद साधताना सुरुवातीलाच कोंबडी चोराची पीस तुम्हीच उपटली आहेत. उरली सुरली पण उपटून टाका अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी भाषणाला सुरुवात केली. त्यानंतर दीपक केसरकरांवर देखील आपला ठाकरी 'बाण' उगारला.
ते म्हणाले, आज कुटुंब संवाद करायला आलो आहे. अनपेक्षितपणे मी मुख्यमंत्री झालो होतो. जनतेची सेवा करण्याच काम मी केलं. आपल्याकडे मन की नाही, दिलं की बात आहे. आमच्याकडे हृदयात राम आणि हाताला काम आहे. मी बांद्यापासून चांद्यापर्यंत जाणार आहे. शिवसेना कुणाची हे विचारायला मी आलो आहे असा सवाल त्यांनी केला. तर दीपक केसरकरांवर बोलताना, इथला डबल गद्दार म्हणत हा कलंक ते पुसू शकत नाही. दर आठवड्याला शिर्डीला जाणारा, श्रद्धा-सबुरी मानणारा माणूस वाटला होता. तांदळाचा किस्सा भास्कर जाधवांनी सांगितला. गद्दारी नसानसात भिनलेला गद्दारच रहाणार असा टोला त्यांनी नाव न घेता लगावला.
तर विनायक राऊतांना निवडून दिलत म्हणून कोकण आज वाचलं. एक वळवळ आहे ती पण साफ करून टाका. लादी चकचकीत केली तशी झाडू घेऊन सगळी घाण साफ करायची आहे. सावंतवाडीतही करायची आहे. आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत यांनी ती याआधी केली आहे. येणाऱ्या निवडणुकीत देखील ती आपणास करायची आहे. गणपत गायकवाडांनी का गोळीबार केला ? हे समोर आलं पाहिजे. मिंदेंमुळे गुंडांची पैदास होईल असं त्यांचं मत आहे. त्यांची बाजू घेणार नाही पण वस्तुस्थिती कळली पाहिजे. गणपत गायकवाडांनी कबुली ही दिलेली आहे. त्यामुळे आता पाहू मोदी गॅरंटी कुणाला पावते असंही ते म्हणाले. तर मोदींचे आम्ही शत्रू नाही. आम्ही तुमच्या सोबत होतो. नंतर तुम्ही आम्हाला दुर टाकलं. आम्ही हिंदुत्व सोडलेले नाही, सोडणार नाही. तुमच्या पिलावळीनं देशाचं काम केलं असतं तर पक्ष फोडायची गरज तुम्हाला पडली नसती असं विधान त्यांनी केल.
दरम्यान, जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणलंच पण, खासगी मेडिकल कॉलेजला पण मी परवानगी दिली होती मुख्यमंत्री असताना. चांगल्या गोष्टींच्या आड मी कधीही येणार नाही. समोरचा कितीही विरोधक असू देत. शासकीय मेडीकल कॉलेजच्या आड कुणी येत होत त्याची नाव घेऊ इच्छित नाही असंही ते म्हणाले. बोलणाऱ्यांना बोलत राहूदेत लक्ष देऊ नका. निवडणूकीचा नारळ फुटूदेत मी परत येणार आहे. विजयाच्या सभेला ही येईन. गद्दारांची घराणेशाही आजही चालू राहिली असती जर तुम्ही ती चिरडली नसती. इथल्या पानबुडीला मंत्री असताना गो अहेडच दिलं होत. नौदल दिन प्रथमच कोकणात साजरा झाला. पंतप्रधान यावेळी कोकणाला काहीतरी देतील अशी आशा होती. कोरोना, तौक्तेच्या संकटात एकही पैसा यांनी महाराष्ट्राला दिला नाही. निदान आतातरी काहीतरी देतील असं वाटलं होतं. दिलं तर काही नाही पण, पाणबुडी गुजरातला घेऊन गेले. जिथं येतात तिथलं गुजरातला घेऊन जात आहेत. असे पंतप्रधान तुम्हाला पुन्हा हवेत का ? मोदी रथ फिरत आहे. त्याला गावकरी अडवत आहेत याचा अभिमान वाटत आहे. भारत सरकार असताना मोदी सरकार हे काय ? असा सवाल त्यांनी केला.
तर, हल्ली तर फोन सुरु केलेत. पुन्हा भाजपला मतदान करणार का विचारत आहेत. आम्हाला दहा वर्षांत काय मिळालं हा विचार सामान्य लोक करत आहेत. पुन्हा भाजपला मत देणार नाही असं ते सांगत आहेत. २०१४ ला 'चाय पे चर्चा' सारखं आपण 'होऊ दे' कार्यक्रम करू, गेल्या दहा वर्षांत काय मिळालं हे विचारु असं मत व्यक्त केल. तर शेतकऱ्यांनी बोलावं यासाठी मी महाराष्ट्रभर फिरणार आहे. नुसत्या घोषणा व अंमलबजावणींचा दुष्काळ असेल तर दुष्काळात तेरावा महिना असणार 'मोदी सरकार' नको, त्यापेक्षा मिलीजुली असलेलं 'इंडिया आघाडी'च सरकार आम्हाला चालेल असं उद्धव ठाकरे म्हणाले. तर मोदी सरकारच्या योजना त्यांनी वाचून दाखवल्या. सगळा फायदा गुजरातला, आम्ही करायचं काय ? किती स्मार्ट सिटी यांनी उभारल्या. मी विरोधक हा हुकुमशाहाचा व खोटारड्यांचा आहे. आताच्या सरकारमध्ये गॅंगवॉर आहे. तिसरी गँग ७० कोटींच्या घोटाळ्यात बुडलेली आहे. इथला गद्दार तुम्ही घेतला. भेकडांची फौज घेऊन आमच्यावर चालून येतायत ? भाजप संपवायच काम महाराष्ट्रात केलं आहे. आमचा पक्ष हा शिवसैनिक आहे. आमची संघटना आणखीन फोफावत आहे. हिंदू तर आहेच पण मुस्लिम सुध्दा सोबत आहे. आमचं हिंदुत्व घर पेटवणार नाही. घरातील चुल पेटवणार आहे. तुमच्या ताकदीवर मी लढत आहे. उद्धव ठाकरेची ताकद ही वडिलोपार्जित आहे ती म्हणजे हे शिवसैनिकांच कवच आहे. गद्दारांना गाडायच काम माझे शिवसैनिकच करतील असा विश्वास माजी मुख्यमंत्री, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. तर हुकुमशाही गाढायची आहे. आजचा वार कोंबडी वड्याचा आहे. माझ्याकडे भाडखाऊ माणसं नाहीत. हृदयाशी नातं असलेली माणसं आहेत. यांच्या जीवावर मी लढायला उभा राहिलो आहे. आमचे दिवस येतील तेव्हा बघा. सगळेच बाळासाहेबांचे शब्द मला बोलणं शक्य नाही. पण चक्रवाढ व्याजास परतफेड होईल. जे अंगावर आले त्यांच नाव येणारी पिढी विसरलेली असेल असा दावा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.
यावेळी खासदार विनायक राऊत,आ. भास्कर जाधव, आमदार वैभव नाईक, आ. रमेश कोरगांवकर, दत्ता दळवी, गौरीशंकर खोत, अरूण दुधवडकर, शैलेश परब, वरूण सरदेसाई, मिलींद नार्वेकर, अतुल रावराणे, संदेश पारकर, जान्हवी सावंत, सतिश सावंत, संजय पडते, बाबुराव धुरी, रूपेश राऊळ, बाळू परब, राजू नाईक, मंदार शिरसाट, सुशांत नाईक, बाळा गावडे, मायकल डिसोझा आदी उपस्थित होते.