
सावंतवाडी : सावंतवाडी संस्थानच्या युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी सावंतवाडी नगराध्यक्षपदासाठी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. आज दुपारी निवडणूक कक्षामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्रीधर पाटील व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी संतोष जिरगे यांच्याकडे त्यांनी आपलं नामनिर्देशन पत्र दाखल केल.
यावेळी सावंतवाडी संस्थानचे राजेसाहेब खेम सावंत भोंसले, राणीसाहेब शुभदादेवी भोंसले, युवराज लखमराजे भोंसले, डॉ. सतिश सावंत, श्री. देसाई, कृष्णा राऊळ आदी उपस्थित होते. भाजपकडून युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले इच्छुक होत्या. उमेदवारी संदर्भात बोलणी सुरू असताना त्यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. भाजपची उमेदवार यादी व एबी फॉर्म येत्या दोन दिवसात जाहीर होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, उबाठा शिवसेनेकडून नगरसेवक पदासाठी तेजल कोरगावकर, श्रृतिका दळवी, चंद्रशेखर सुभेदार, उमेश कोरगावकर यांनी तर अपक्ष ऋग्वेद सावंत व आशुतोष हेळेकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली आहे. आज एकुण ७ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून सीमा मठकर यांच्यासह युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांच नगराध्यक्षपदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आले आहे.










