'त्या' तत्कालीन सरपंच - ग्रामसेवक यांना कारणे दाखवा नोटीस

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: August 16, 2023 19:51 PM
views 190  views

मालवण : ग्रामपंचायत वायंगणी येथे जानेवारी २०१८ ते डिसेंबर २०२२ या कालावधीतील गैरकारभार प्रकरणी पंचायत समिती माध्यमातून चौकशी करण्यात आली आहे. या प्रकरणी तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून पुढील कार्यवाही सुरू आहे असे लेखी पत्र मालवण पंचायत समिती गटविकास अधिकारी आप्पासाहेब गुजर यांनी वायंगणी ग्रामपंचायत सदस्य मालती जोशी यांना दिले. 

लेखी पत्र प्राप्त होताच मालती जोशी यांनी मालवण पंचायत समिती समोर छेडलेले उपोषण स्थगित केले आहे. तत्कालीन सरपंच व ग्रामसेवक यांना नोटीस बजावून खुलासा मागविण्यात आला आहे. मात्र, संबंधितांचे खुलासे अद्याप प्राप्त झाले नाहीत, तरी याबाबत १५ दिवसात नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल असेही गटविकास अधिकारी यांनी दिलेल्या पत्रातून स्पष्ट केले आहे.