
वेंगुर्ले : वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड प्रमाणात औषधांचा कमी प्रमाणात पुरवठा होत असल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत.त्यामुळे जनतेला खाजगी रुग्णालय गाठावे लागत असल्याने आर्थिक भुर्दंड पडत आहे . याबाबत २४ तासात कार्यवाही न झाल्यास जिल्हा कार्यालयासमोर सिंधुदुर्ग जिल्हा ठाकरे शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे . याबाबत पदाधिकारी यांच्यावतीने सोमवारी
जिल्हा शल्य चिकित्सक श्रीपाद पाटील यांच्याकडे निवेदन देण्यात आले आहे. या उपजिल्हा रुग्णालयात औषधांचा कमी पुरवठा होत असल्याने गोरगरीब रुग्णांना खाजगी मेडिकल मधून औषधे खरेदी करावी लागत आहेत. आधीच महागाईत होरपळलेल्या गोरगरीब , सर्वसामान्यांना आर्थिक भुर्दंड पडत आहे. तालुक्यात उपजिल्हा रुग्णालय असूनही प्राथमिक गरजेची औषधेही या रुग्णालयात उपलब्ध नसल्याने संताप व्यक्त होत आहे. येथे २४ तासात औषधे उपलब्ध न झाल्यास जिल्हा कार्यालयासमोर सिंधुदुर्ग ठाकरे शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल , असा इशारा देण्यात आला आहे.यावेळी ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी , वेंगुर्ले तालुकाप्रमुख तथा माजी सभापती यशवंत उर्फ बाळू परब , विजय जाधव ,श्री. आयनोडकर , संदेश राणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.दरम्यान संबधित आरोग्य प्रशासनास तात्काळ औषध पुरवठा करण्याबाबत सूचना देण्यात येणार असल्याचे आश्वासन श्रीपाद पाटील यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिले. रुग्णांच्या जीवाशी खेळण्याचे असे प्रकार वारंवार होत राहिल्यास वेंगुर्ले तालुक्यातूनही तीव्र आंदोलन करण्यात येईल , असा इशारा यशवंत उर्फ बाळू परब यांनी दिला आहे.