
कणकवली : कणकवली शहरातील दहावीत शिकणाऱ्या दोन मुलींचे अपहरण झाल्याची तक्रार कणकवली पोलीस ठाण्यात दाखल झाली. त्यानुसार अज्ञात आरोपी विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. एका युवतीच्या वडिलांनी याबाबत तक्रार दिली .
आपली मुलगी व तिची मैत्रीण गुरुवारी सकाळी १०.३० वाजण्याचा सुमारास विद्यामंदिर येथे गेल्या. तेथून रिक्षाने भालचंद्र महाराज यांच्या मठाजवळ जावून तेथून त्यांची मैत्रीणकडे जात असल्याचे सांगून निघून गेल्या. मात्र, रात्री दोघी घरी न परतल्याने सर्वत्र शोध घेतला असता त्या सापडून आल्या नाहीत. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाण्यात जावून अज्ञात इसमाने त्या दोघींचे अपहरण केल्याची तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात भादंवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास कणकवली पोलीस करीत आहेत.