जनरेटर बंद करताना शॉक | कामगाराचा मृत्यू

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: February 05, 2024 14:05 PM
views 162  views

मालवण  : हडी येथे बर्फ कारखान्यात जनरेटर बंद करताना शॉक लागून रोशन लाल (३६ रा. बस्ती, उत्तरप्रदेश, सध्या रा. हडी) या कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलीसांनी आकस्मित मृत्यू म्हणून नोंद केली आहे. शवविच्छेदन नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मृतदेह अंत्यसंस्कारासाठी उत्तरप्रदेश याठिकाणी नेण्यात येणार असल्याने पोलीसांकडून तातडीने आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करण्यात आली. 

रोशन लाल याचा भाऊ महेश कुमार लाल याने पोलीसात माहिती दिली. सकाळी ६ वाजता नेहमीप्रमाणे आपण फॅक्टरी चालू करून काम करण्यास सुरूवात केली. माझ्या सोबत माझा भाऊ रोशन लाल व सनीकुमार यांनी कामास सुरूवात केली. ९.३० वाजता फॅक्टरीतील लाईट गेली म्हणून आम्ही जनरेटर चालू करून बर्फ काढणे, क्रश करणे अशा कामास सुरूवात केली. व क्रश केलेला बर्फ इन्सुलेटर व्हॅनमध्ये भरण्यास सुरूवात केली. सदर बर्फ भरून झाल्यानंतर नेहमीप्रमाणे रोशन लाल जनरेटर बंदर करण्यासाठी गेला, परंतु जनरेटर बंद न झाल्याने माझ्या सोबत असलेला सनीकुमार यास जनरेटर अजुन बंद का झाला नाही हे पाहण्यासाठी पाठविले. तेव्हा रोशन लाल जमीनीवर पडलेला होता. त्याला उठविण्याचा प्रयत्न केला परंतु त्याची काहीच हालचाल होत नसल्याने त्वरीत आजुबाजुच्या लोकांना बोलावून रुग्णवाहिकेतून मालवण ग्रामीण रुग्णालयात आणले, मात्र त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी स्पष्ट केले.  याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली हेमंत पेडणेकर व सुशांत पवार हे करीत आहेत.