सावंतवाडीत सेना की भाजप ?

महायुतीचं तिकीट कुणाला ? ; महाआघाडीचं काय ठरलं ?
Edited by: विनायक गावस
Published on: November 16, 2023 17:01 PM
views 469  views

सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात आमदारकीच्या तिकिटासाठी शिवसेना आणि भाजपात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. शिवसेनेकडून शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे चौथ्यांदा लढण्यासाठी इच्छुक आहेत. तर भाजपकडून माजी आमदार राजन तेली देखील मतदारसंघावर दावा करत आहेत. त्यामुळे निवडणूकीत युती कायम राहिल्यास ही जागा कुणाला सुटणार ? याकडे राजकीय वर्तुळाच लक्ष लागून राहिले आहे. तर महाविकास आघाडीतून राष्ट्रवादीच्या अर्चना घारे-परब यांनी मतदारसंघात तळ ठोकला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे शैलेश परब देखील इच्छुक असल्यानं महाविकास आघाडी कुणाला संधी देत यावर पुढील गणित अवलंबून आहेत.


गेली दोन टर्म राजन तेली भाजपकडून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून प्रयत्नशील आहेत. २०१४ ला तेलींनी भाजपच्या चिन्हावर २९,९१० मत मिळाली होती. तर २०१९ ला भाजपच्या पाठिंब्यावर अपक्ष राहत त्यांनी तब्बल ५६,५५६ मत मिळवली. मात्र, दोन्हीवेळा दीपक केसरकर यांनी त्यांना पराभवाची धूळ चारली. दीपक केसरकर यांनी ६९,७८४ मत मिळवत तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून येण्याचा पराक्रम करत मतदारसंघात हॅट्रिक केली. याआधी जे कुणालाही साध्य करता आलं नाही ते दीपक केसरकरांनी करून दाखवल. बदललेल्या राजकीय परिस्थिती थेट कॅबिनेट मंत्रीपद त्यांनी सावंतावडीत आणल‌. राज्यात महायुतीच सरकार स्थापन झालं. अशातच आता २०२४ च्या लोकसभा, विधानसभेचे वारे मतदारसंघात वाहू लागले आहेत. येणाऱ्या निवडणुका महायुतीतूनच लढणार असं वरिष्ठ नेते सांगत आहेत. परंतु, युतीत असणारी सेना-भाजपची मंडळी  एकमेकांना अंगावर अन् शिंगावर घेण्यास सज्ज झाली आहेत. मी खासदारकीसाठी इच्छुक नाही सावंतवाडीतून आमदारकीच लढवणार असं दीपक केसरकर यांनी जाहीर केलय. तर सावंतवाडीत भाजप कमळ निशाणीवर लढणार असल्याचा दावा राजन तेलींनी केलाय.


याच पार्श्वभूमीवर दोडामार्गात बॉयकॉट दीपकभाई असे बॅनर लागले आहेत. हे बॅनर कुणी लावले ? मागचा सुत्रधार कोण? हे अद्याप समजलेल नाही. यातच दीपक केसरकर, राजन तेली यांसह महाविकास आघाडीतून राष्ट्रवादीकडून अर्चना घारे-परब, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून शैलेश परब यांची नावं चर्चेत आहेत‌. महायुतीत देखील सगळं काही आलबेल नाही आहे. तर युवराज लखमराजे भोंसले, मनिष दळवी, संजू परब, विशाल परब या नावांची चर्चा देखील मतदारसंघासाठी होत आहे. त्यामुळे २०२४ ला सावंतवाडीच्या सत्तेची चावी कुणाला मिळते ? हे पहाव लागणार आहे. सद्यस्थितीत महायुतीतील विद्यमान आमदार दीपक केसरकर व राजन तेली यांच्यात तिकीटासाठी रस्सीखेच पहायला मिळत असून महायुतीची जागा शिवसेनेला सुटणार ? की भाजप आपला उमेदवार उभा करणार ? याकडेच सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. महाआघाडीच्या निर्णयावरही लक्ष आहे‌. एकंदरीतच युती, आघाडीतील नेत्यांची तिकीटासाठीची रस्सीखेच पाहण्यात मतदारांनी धन्यता मानलेली दिसत आहे. २०२४ ला सावंतवाडी कुणाला संधी देणार हे येणारा काळच ठरविणार आहे.

  • २००९ ते २०१९ ला पडलेली मत


दीपक केसरकर

२०१९ - ६९,७८४ विजयी 

२०१४ -७०,९०२ विजयी 

२००९ -६३,४३० विजयी 


राजन तेली

२०१९ - ५६,५५६ पराभूत 

२०१४ -२९,७१० पराभूत


आजवर झालेले आमदार

१९६२ - शिवरामराजे भोंसले

१९६७ - शिवरामराजे भोंसले

१९७२ - प्रतापराव भोंसले

१९७८- जयानंद मठकर

१९८० - शिवरामराजे भोंसले

१९८५ - शिवरामराजे भोंसले

१९९० - प्रविण भोंसले

१९९५ -प्रविण भोंसले

१९९९ - शिवराम दळवी 

२००४ - शिवराम दळवी

२००९ - दीपक केसरकर

२०१४- दीपक केसरकर

२०१९- दीपक केसरकर

२०२४ - ?


या राजकीय पक्षांना दिली संधी !

राष्ट्रीय कॉंग्रेस - ७ टर्म 

जनता दल - १ टर्म 

राष्ट्रवादी काँग्रेस - १ टर्म 

शिवसेना - ४ टर्म