सेना-भाजप राडा प्रकरणी गुन्हे दाखल ; परस्परविरोधी तक्रारी

पोलिस ठाण्यातच भांडण भोवल ; ५० जणांवर स्वतंत्र गुन्हे
Edited by: विनायक गावस
Published on: December 03, 2025 10:27 AM
views 373  views

सावंतवाडी : मतमोजणीच्या अंतिम टप्प्यात फॉरेस्ट ऑफिस समोर झालेल्या वादावादी प्रकरणी परस्पर विरोधी तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले. यात शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, उमेदवार ॲड निता सावंत-कविटकर तसेच भाजप उमेदवार ॲड अनिल निरवडेकर, माजी सरपंच विनोद राऊळ यांच्यासह अन्य काहींवर परस्पर विरोधी तक्रारीनुसार गुन्हे दाखल झालेत. तर पोलीस ठाण्यात शांतता भंग केल्याबाबत दोन्ही गटातील ५० व्यक्तींवर स्वतंत्र गुन्हा पोलिसांमार्फत दाखल करण्यात आलेला आहे. 


सायंकाळी मतदानाच्या अंतिम टप्प्यात भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या खाजगी सुरक्षारक्षकांची गाडी अंगावर घालण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी गाडी रोखली. यावेळी गाडीत श्री‌.  परब यांच्या सुरक्षिततेसाठी असेलला पोलिस असल्यान आक्षेप घेतला. तर बाचाबाची दरम्यान खाजगी बॉडीगार्डला शिवसैनिकांनी प्रसाद दिला. याप्रकरणी भाजपकडून स्कॉर्पिओ चालक अमरीश यादव (रा. चराठा) याने दिलेल्या तक्रारीवरून शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, उमेदवार ॲड निता सावंत-कविटकर, अजय गोंदावळे, क्लेटस् फर्नांडिस, ज्ञानेश्वर पाटकर, प्रफुल्ल गोंदवले वगैरे २० ते २५ जणांवर वाहन अडवून मारहाण, धमकी, शिवीगाळ केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच शिवसेनेचे ज्ञानेश्वर पाटकर (रा. सावंतवाडी) यांच्या तक्रारीवरून स्कॉर्पिओ मधील अमरीश यादव  स्कार्पिओने हुल दिल्याने थांबून विचारले असता चालक वगैरे दोन व भाजप उमेदवार ॲड. अनिल निरवडेकर, माजी सरपंच विनोद राऊळ वगैरे २० ते २५ जणांनी धमकी दिल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


दरम्यान, या वादानंतर पोलिस ठाण्यात देखील भाजप आणि शिवसेना कार्यकर्ते भिडले. जाळूण टाकण्याची धमकी पोलिस ठाण्यात भाजपच्या अमित परब यांच्याकडून देण्यात आली. पोलीस ठाण्यामध्ये दोन्ही गटातील नेत्यांची चर्चा सुरू असताना हा प्रकार घडला. शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब व भाजपचे युवा नेते विशाल परब यावेळी पोलिस ठाण्यात उपस्थित होते. मनाई आदेशाचा भंग करून एकमेकाच्या अंगावर धावून जाणे, पोलीस ठाणे आवारात शांतता भंग व असभ्य वर्तन केल्यावरून भाजपचे अमित परब आणि शिवसेनेचे युवा सेना तालुकाप्रमुख क्लेटस फर्नांडिस वगैरे अशा दोन्ही गटातील सुमारे 40 ते 50 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिला. रात्री उशिरापर्यंत पोलिस उपविभागीय अधिकारी विनोद कांबळे, पोलिस निरीक्षक अमोल चव्हाण यांच्यासह सावंतवाडी पोलिसांकडून कारवाई सुरू होती. पुढील कार्यवाही सावंतवाडी पोलिस करत आहे.