वन संज्ञेत अडकलेल्या शिवापूर - शिरशिंगे रस्त्याचा तिढा सुटला

Edited by: उमेश बुचडे
Published on: April 22, 2024 13:54 PM
views 333  views

कुडाळ : तालुक्यातील शिवापूर आणि सावंतवाडी तालुक्यातील शिरशिंगे या दोन गावातून  कुडाळ आणि सावंतवाडी या तालुक्यांना जोडणाऱ्या रस्त्याचा तिढा सुटला आहे. वन संज्ञा असलेल्या ३.७० हेक्टर जमिनीला कोल्हापूर जिल्ह्यात पर्यायी जमीन देऊन डायवर्जन ची प्रक्रिया पूर्ण केली आहे. या प्रस्तावास केंद्र सरकार च्या पर्यावरण, वन आणि जलवायु  मंत्रालय ने मान्य दिली आहे.या खात्याचे सेक्रेटरी सी.बी.तशिलदार यांनी तसे आदेश जारी केले आहेत. या डायवर्जन प्रक्रियेसाठी भाजप नेते केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. कोल्हापूरचे माजी पालकमंत्री असलेले शिक्षण मंत्री दीपक केसरकर, पालकमंत्री रवींद्र चव्हाण भाजप नेते माजी खासदार निलेश राणे यांनी या जमीन डायवर्जन साठी नेहमी पाठपुरावा केला.त्याबद्दल दोन्ही गावातील प्रमुख ग्रामस्थ आणि पदाधिकाऱ्यांनी या सर्वांचे आभार मानले आहेत.

शिवापूर- शिरशिंगे रस्ता वन संज्ञे मुळे अडकला होता . त्यामुळे तीन किलोमीटरचा रस्ता पक्का करता आलेला नाही. हा रस्ता वाहतुकीसाठी  पूर्ण क्षमतेने वापरता येत नाही. शिवापूर शिरशिंगे रस्त्यामुळे सावंतवाडी तालुका आणि शहर जोडण्यासाठी फार महत्त्वाची भूमिका या रस्त्याची राहणार आहे. सह्याद्री मार्गातून जाणारा हा महत्त्वपूर्ण रस्ता असल्याने आणि दोन्ही तालुक्यांना जोडणारा रस्ता असल्यामुळे पंचक्रोशीतील जनतेची गेले दहा वर्षे सातत्याने मागणी होती. सार्वजनिक बांधकाम विभागाने या रस्त्यावर काही प्रमाणात निधी खर्च केला मात्र वन संज्ञा असल्यामुळे वनविभागाचा विरोध राहिला. त्यामुळे काही भाग डांबरीकरण करता आलेला नाही. मात्र आता या रस्त्यावर खडीकरण डांबरीकरण करून संपूर्ण वाहतुकीसाठी हा रस्ता खुला होणार आहे. वनविभागाचे या रस्त्यासाठी जाणारी जमीन दुसऱ्या ठिकाणी राज्य सरकारच्या जमिनीतून घेतलेली आहे.राज्य सरकारने  कोल्हापूर येथील जमीन दिली आहे.त्यासाठी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सहकार्य केले होते.ही डायवर्जन ची खूपच अवघट असलेली प्रकिया पूर्ण केली आहे.यासाठी शिवापूर गावचे सुपुत्र आणि कुडाळ चे माजी सभापती मोहन सावंत यांनी सातत्यपूर्ण पाठपुरावा वन व बांधकाम विभागाकडे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे,पालकमंत्री रवींद्र चव्हाण,माजी खासदार निलेश राणे यांच्याकडे केला. या प्रक्रियेत जिल्हा बँकेचे संचालक रवी मडगावकर, माजी जिल्हा परिषद सदस्य पंढरी राऊळ, जीवन लाड, सरपंच दीपक राऊळ, पुरुषोत्तम राऊळ,यांच्या सह शिवापूर शिरशिंगे पंचक्रोशीतील सर्व सरपंच, ग्रामस्थ यांचे फरमोठ योगदान आहे.

दरम्यान या रस्त्याला २.५० कोटी रुपयाचा निधी महायुतीच्या सरकार मध्ये पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी यापूर्वीच दिला आहे मात्र जमीन डायवर्जन करण्यासाठी ची प्रक्रिया जोपर्यंत पूर्ण होत नाही. तोपर्यंत त्यावर हा निधी खर्च करू नये.अशी अट होती. मात्र ही प्रक्रिया आता पूर्णत्वाकडे गेली असल्यामुळे हा रस्त्या बांधण्यास परवानगी मिळणार आहे.